ऑर्थर रोड तुरुंगात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीमध्ये सहा कैदी जखमी झाले आहेत. सोमवारी सकाळी घडलेल्या या घटनेत अ‍ॅल्यूमिनियमचे ताट फाडून त्यापासून तयार करण्यात आलेल्या शस्त्राचा वापर वार करण्यासाठी करण्यात आला आहे. कैद्यांमधील हाणामारी रोखण्यास गेलेल्या तुरुंगाधिकाऱ्यांबरोबर काही पोलिसांनाही किरकोळ मार लागला आहे. पाचही कैद्यांविरुध्द ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नेमक्या कोणत्या कारणामुळे ही हाणामारी झाली, याचा तपास करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑर्थर रोड तुरुंगामध्ये खटला सुरु असलेल्या कैद्यांना ठेवण्यात येते. सोमवारी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास सर्कल क्र. ७ येथे मुदस्सर इस्माईल अन्सारी (३०), सरवर मकसूद खान (३२), सुलेमान महमूद पटेल, गोपाळ बाबू शेट्टी, अरमान नफीस खान या मुस्तफा डोसा टोळीतील गुंडांची नायर टोळीतील विशाल आमकर आणि मुरगन नाडर (५२,) जाकीर बशीर खान, सचिन कणसे, संतोष परब, राजा नायर, सुनील निगेरी अशोककुमार केवट यांच्याशी भांडण झाले. यावेळी कैद्यांना जेवणासाठी देण्यात येणाऱ्या अ‍ॅल्यूमिनिमच्या ताटाला धारदार बनवून तयार करण्यात आलेल्या कापणीच्या मदतीने सरवर मकसूद खान, सुलेमान पटेल यांनी विशाल आमकर आणि मुरुगन नाडर यांच्यावर वार करुन त्यांना जखमी केले. यात मुदस्सर आणि इतर तीन कैदीही जखमी झाले. मारहाण थांबविण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी प्रयत्न केले. मात्र दोन्ही टोळीतील सदस्य आक्रमक झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तुरुंगाधिकारी ए. एस. पानसरे, हरिश्चंद्र मार्के यांनी शिट्टी वाजवत कैद्यांना मागे सरकण्यास सांगितले. तरीही बेभान झालेले कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी सुरुच होती. अखेर, पोलिसांनी लाठीमार करत दोन्ही गटातील कैद्यांना दूर केले. या संपूर्ण घटनेत तुरुंगाधिकारी पानसरे आणि इतर कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की झाली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prison inmates fighting at arthur road jail
First published on: 31-05-2016 at 03:09 IST