मुंबई : कृषी अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याने आणि गेल्या वर्षांपासून हा अभ्यासक्रम ‘व्यावसायिक’ झाल्याने यंदा या अभ्यासक्रमांचे शुल्क भरमसाठ वाढले आहे. बहुतांश खासगी महाविद्यालयांनी आपल्या शुल्कात तब्बल २५ ते ४० टक्के वाढ केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांचा सर्वाधिक ओघ असलेल्या या अभ्यासक्रमाचे शुल्क लाखो रुपयांच्या घरात गेले आहे.

कृषी अभ्यासक्रम ‘व्यावसायिक’ झाल्यानंतर राज्य सामायिक प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून प्रवेशाबरोबरच या अभ्यासक्रम चालवणाऱ्या महाविद्यालयांचे शुल्कही नियमन प्राधिकरणाने निश्चत करण्याचे आदेश देण्यात आले. हे शुल्क पूर्वी महाविद्यालयांच्या संघटना निश्चित करायच्या. प्रधिकरणाने शुल्क निश्चितीनंतर विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होण्याऐवजी प्रत्यक्षात हा बदल संस्थांच्याच पथ्यावर पडल्याचे दिसत आहे. मोजक्या महाविद्यालयांचेच शुल्क गेल्यावर्षीपेक्षा कमी झाले आहे. मात्र बहुतांशी महाविद्यालयांचे शुल्क वाढल्याचेच दिसत आहे.

शुल्कमर्यादा ओलांडली..

बी.टेक जैव  व अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान या विषयांचे शुल्क ७५ हजार निश्चित करण्यात आले होते. प्रत्यक्षात अनेक महाविद्यालयांचे शुल्क यंदा ८० हजार ते १ लाख रुपयांच्या घरात गेले आहे.

बीएस्सी (अ‍ॅग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर), कृषी अभियांत्रिकी या विषयांचे शुल्क ४५ हजार रुपये होते. ते आता ५० ते ८० हजार रुपयांच्या घरात आहे.

कपातीचे प्रमाण मोजकेच..

जैवतंत्रज्ञान विषयाच्या चार महाविद्यालयांचेच शुल्क घटले असून ते ६५ हजार रुपये झाले आहे. अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान विषयांतील २५ पैकी ५ महाविद्यालयांचे शुल्क ६० हजार रुपयांपर्यंत कमी झाले आहे. बीएससी अभ्यासक्रमाच्या विषयातील सत्तरहून अधिक महाविद्यालयांपैकी अवघ्या १६ महाविद्यालयांचेच शुल्क हे ४५ हजार रुपये कायम राहिले आहे तर शेतकी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या ३ महाविद्यालयांचीच शुल्कवाढ झालेली नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Private colleges increase agriculture courses fees
First published on: 13-04-2019 at 02:27 IST