मच्छीमार संघटनांनी मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढवावा यासाठी गेल्या दोन महिन्यांत जोरदार प्रयत्न केले होते, मात्र यावर्षी तरी मासेमारी बंदीचा कालावधी वाढण्याची शक्यता नाही.

केंद्र सरकारच्या निर्णयानुसार पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर पावसाळा आणि माशांच्या प्रजननाच्या कालावधीनुसार मासेमारीस बंदी घातली जाते. पश्चिम किनारपट्टीवर १ जून ते ३१ जुलै मासेमारीस बंदी असते. या कालावधीत बदल करायचा असेल तर किनारपट्टीवरील जिल्हा सल्लागार समितीकडून त्यासंदर्भात प्रस्ताव मागवावे लागतात. त्यानंतर राज्य शासनाकडून तसा प्रस्ताव केंद्राला पाठवावा लागतो. मात्र जिल्हा समितीच्या बैठकाच अजून बोलावल्या नाहीत, त्यामुळे हा यावर्षी तरी मासेमारी बंदीचा कालावधी वाढण्याची शक्यता नाही.

पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारे मच्छीमार हे नारळी पौर्णिमेनंतर मासेमारी करण्यास बाहेर पडतात. त्यामुळे मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढवावा अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केली होती. त्या अनुषंगाने मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी १२ जूनमध्येच शासनाला याबद्दल पत्र पाठवले होते, त्यावर कसलीच हालचाल शासनाने केली नाही. दरम्यान, काही संघटनांनी मंत्री महादेव जानकर यांची या संदर्भात भेट घेतली होती. मात्र मासेमारी बंदीची मुदत संपल्यानंतरदेखील कोणतेही परिपत्रक काढण्यात आलेले नाही.