दुरुस्ती कामांमुळे आंबेडकरी अनुयायांच्या मार्गात अडथळे

दादर पश्चिमेला असलेल्या पादचारी पुलाचे आणि दादरच्या रानडे रोडवरील रस्त्याचे काम अपूर्णावस्थेत असल्याने ६ डिसेंबरला महापरिनिर्वाणदिनी या परिसरात येणाऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६० व्या महापरिनिर्वाणदिनी यंदा मोठय़ा संख्येने अनुयायी दादर चत्यभूमीवर येण्याची शक्यता आहे. दर्शनासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या पाहता पालिकेने दरवर्षीपेक्षा यंदा पाचपट अधिक सोयीसुविधा देण्याच्या दृष्टीने योजना आखली आहे. परंतु, रेल्वे स्थानकापासून चैत्यभूमीकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांची पादचारी पुलाचे आणि रानडे रस्त्याचे अर्धवट काम यामुळे गैरसोय होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो कार्यकर्त्यांची पावले दादरच्या चत्यभूमीकडे वळतात. चत्यभूमीकडे जाण्यासाठी लाखो अनुयायी स्थानकात उतरून शिवाजी पार्ककडे जाणाऱ्या रानडे मार्गाचा वापर करतात; मात्र या मार्गावर नक्षत्र मॉलसमोरील रस्त्याच्या दुरुस्तीचे मोठे काम पालिकेच्या ‘जी’ उत्तर विभागाने काढले आहे. त्यासाठी संपूर्ण रस्ता झाकण्यात आल्याने पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी चिंचोळ्या वाटेचा आधार घ्यावा लागतो. रस्त्याच्या बांधकामामुळे दगड-माती, अर्धवट वाहिन्या आदींचा राडारोडा इथे पडला आहे. त्यामुळे अनुयायांच्या मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत.

दुसरीकडे रेल्वे स्थानकाला पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या मुख्य पादचारी पुलाचा भाग दुरुस्तीच्या कारणास्तव गेली दोन-तीन महिने बंद आहे. पुलाचे बांधकामच अजून सुरू न झाल्याने बाजूच्या दुसऱ्या छोटय़ा पुलाला आधार प्रवाशांना घ्यावा लागतो आहे. हा पूल गर्दीचा भार पेलण्यासाठी अपुरा आहे. या शिवाय या पुलावर फेरीवाले ठाण मांडून बसलेले असतात. त्यांच्या गर्दीतून वाट काढत स्थानक गाठणे जिकिरीचे बनते. अशा परिस्थितीत महापरिनिर्वाणदिनी होणाऱ्या गर्दीला सामावून घेण्यात हा पूल कितपत पुरेसा पडेल या बाबत शंका आहे.

महापरिनिर्वाणदिनी दर्शनाकरिता येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून रस्त्याचे काम डिसेंबर महिना सुरू झाल्यानंतर थांबविण्यात येणार आहे. त्यामुळे, चत्यभूमीकडे जाणारा रानडे रोड खुला होईल.

रमाकांत बिरादर, साहाय्यक आयुक्त, ‘जीउत्तर विभाग