मराठीच्या प्राध्यापिका आणि कवयित्री ज्योतिका सतीश ओझरकर यांचे नुकतेच डोंबिवली येथे कर्करोगाने निधन झाले. त्या ६१ वर्षांच्या होत्या.
ओझरकर या डोंबिवलीच्या ‘काव्य रसिक मंडळा’च्या संस्थापक सदस्य होत्या. ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’च्या स्थापनेतही त्यांनी सहभाग घेतला होता. त्या नुकत्याच सीएचएम महाविद्यालयातून मराठीच्या विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाल्या. अध्यापनाबरोबरच एक कवयित्री म्हणूनही त्यांची मराठी साहित्यविश्वाला ओळख आहे. ७०-८०च्या दशकात ‘कविता दशकाची’ या ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे आणि ना.धो. महानोर यांनी संकलित केलेल्या कवितासंग्रहात प्रा. ओझरकर यांच्याही कविता प्रसिद्ध झाल्या होत्या. ग्रामीण भागातील महाविद्यालयांचे निकाल सुधारण्यासाठी विशेष व्याख्याने घेण्याची योजनाही त्यांचीच. त्यांच्या या उपक्रमशीलतेमुळे त्या विद्यार्थ्यांमध्येही कमालीच्या लोकप्रिय होत्या.