मुंबई: वैद्यकीय उपकरणाच्या विपणनाअंतर्गत आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींना किंवा त्यांच्या कुटुंबाला कोणत्याही स्वरूपातील भेटवस्तू, आर्थिक मोबदला किंवा मनोरंजानात्मक कार्यक्रमांची तिकिटे देण्यास बंदी असेल, असे नुकत्याच आलेल्या वैद्यकीय उपकरण विपणन नियमावलीच्या मसुद्यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
वैद्यकीय उपकरणांच्या विपणनाचे नियमन सध्या औषधोत्पादन विपणनाच्या नियमांतर्गत केले जाते; परंतु आता वैद्यकीय उपकरण नियम २०१७ लागू झाल्यामुळे उपकरणांच्या विपणनासाठी स्वतंत्र नियमावलीची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे केंद्रीय औषधोत्पादन विभागाने वैद्यकीय उपकरणाच्या नियमनासाठी स्वतंत्र नियमावली तयार केली आहे. या मसुद्यावर १५ एप्रिलपर्यंत सूचना आणि हरकती सादर करता येतील.
कोणते वैद्यकीय उपकरण वापरासाठी सुरक्षित आहे हे कोणत्याही चाचण्या केल्याशिवाय नमूद करू नये. वैद्यकीय उपकरणांचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत, असे नमूद करणे चुकीचे आहे. जाहिरातींमध्ये उपकरणांबाबत सत्य आणि अचूक माहिती द्यावी. अन्य उत्पादकांच्या उपकरणासोबत तुलनात्मक मुद्दे नमूद करायचे असल्यास जाहिरातीमध्ये त्या उपकरणाविषयीही सत्य आणि अचूक माहिती देणे अपेक्षित आहे. विपणनासाठी वापरण्यात आलेल्या मुद्रित, ध्वनिमुद्रित अशा सर्व प्रकारच्या पद्धतीच्या साहित्यांमध्ये या कायद्याचे पालन केले जावे. उपकरणाच्या नावासह उत्पादकाचे किंवा आयात करणाऱ्या कंपनीचे नाव, पत्ता, उपकरणाचे जेनरिक नाव, वापर करण्याची पद्धती, वापरताना घ्यावयाची काळजी आणि कोणत्या परिस्थितीत वापरू नये याची माहिती देणे गरजेचे आहे, असे यात नमूद केले आहे. ही नियमावली सध्या तरी ऐच्छिक असेल. सहा महिन्यांनंतर त्याचा आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर ही नियमावली बंधनकारक केली जाईल, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.
मनोरंजनात्मक कार्यक्रमांस मनाई
वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी कंपन्यांनी चित्रपटगृह, विनोद, संगीत, खेळ, स्पा, सहल इत्यादी कोणत्याही प्रकारचे मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास किंवा त्यासाठी पैसेही देण्यास या नियमावलीनुसार मनाई आहे.
नियमावलीच्या मसुद्यात काय?
आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे नाव किंवा छायाचित्राचा वापर उत्पादनाच्या विपणनासाठी वापरू नये. विक्री प्रतिनिधींनी (एमआर) वैद्यकीय क्षेत्रातील कंपन्या, सेवा देणाऱ्या व्यक्तींना संपर्क साधण्यासाठी कोणताही आर्थिक मोबदला देऊ नये. प्रतिनिधींनी कायद्याचे उल्लंघन केल्यास संबंधित कंपनी त्यासाठी जबाबदार असेल. उपकरणाच्या दर्जाची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीकडे देऊ नये. तसेच उपकरण दिलेल्या आरोग्य क्षेत्रातील व्यक्ती, उत्पादनाचे नाव, दिलेल्याची दिनांक, उपकरण नग इत्यादी माहिती ठेवणे आवश्यक असेल, असे यात स्पष्ट केले आहे.