मुंबई : वेदांत-फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापले असताना आता रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर नेण्याच्या हालचाली सुरू झाल्याचा आरोप शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात रायगडमध्ये रोहा-मुरुड भागात बल्क ड्रग पार्क प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले.

हेही वाचा >>> “जयंत पाटलांचा दावा सपशेल खोटा”, फॉक्सकॉन कंपनी गुजरातला नेण्यावरून भाजपा नेते अमित साटम यांचा पलटवार

बल्क ड्रग पार्कमुळे ८० हजार जणांना रोजगार मिळणार होता. पण आता हा प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर नेण्याचे घाटत आहे. शिंदे-फडणवीस सरकारचे कारभारात लक्ष नसल्याने हे घडत आहे. अजून तरुण शांत आहेत. पण त्यांचा अंत नका पाहू नका, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बल्क ड्रग पार्कसाठी केंद्राला आम्ही पत्र देऊन मागणी केली होती. पण तोही महाराष्ट्राबाहेर नेण्याचे घाटत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवदर्शन करत फिरत आहेत. या प्रकल्पाबाबत सरकारमधील मंत्र्यांना विचारले तर उद्योगमंत्री म्हणतील की, हा प्रकल्प आरोग्य विभागाचा आहे. आरोग्यमंत्री म्हणतील हाफकिनच्या माणसाला विचारा, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.  फॉक्सकॉन प्रकल्प येणार असे खुद्द शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केले. पण नंतर दुर्लक्ष केले. उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना हा विषय माहिती नाही. किमान उद्योगमंत्र्यांनी उत्तरे दिली पाहिजेत. केंद्र सरकारच्या दबावामुळे हा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातला गेला, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.