अनेक ‘सेलिब्रेटीं’च्या सुरक्षेची धुरा सांभाळणाऱ्या ‘टॉप्स सिक्युरिटी’ या नामांकित खासगी सुरक्षा कंपनीने दहा कोटी रुपयांचा कर चुकविल्याप्रकरणी सेवा कर विभागाने कंपनीच्या मालकीची मालमत्ता जप्त केली.
गोरेगाव येथील कंपनीच्या कार्यालयाची पाच मजली इमारत ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सेवा कर विभागाचे उपायुक्त समीर वानखेडे यांनी दिली. कंपनीला नोटीशीद्वारे त्याची आगाऊ सूचना देण्यात आली होती. तसेच कंपनीचे मालक राहुल नंदा हे नियमित करचुकवे असल्याचेही वानखेडे यांनी सांगितले.
सुरक्षा पुरविण्यासाठी मिळणाऱ्या पैशांवरील कर कंपनीतर्फे बुडविण्यात आला असून सध्या तरी हा आकडा १० कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यावरील व्याजापोटी १० कोटी रुपये आकारण्यात आले आहेत. कंपनीकडून सुरक्षा सेवा घेणाऱ्यांकडून २० कोटी रुपये वसूल करण्यात आले असून दर महिन्याला कंपनीने जो कर चुकविला त्यासाठी कार्यालयाच्या इमारतीवर जप्त आणली.
दरम्यान, ‘पानसिंग तोमर’ या पुरस्कारविजेत्या चित्रपटाचा दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांच्याविरुद्धही सेवा कर विभागाने सेवा कर चुकविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दिग्दर्शक वा लेखक म्हणून व्यावसायिक शुल्क आकारणाऱ्यांनाही सेवा कर भरणे अनिवार्य आहे. असे असतानाही धुलिया यांनी ४७ लाख रुपयांचा सेवा कर भरला नाही. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर धुलिया यांना समन्स बजावण्यात आले. त्यानंतर त्यांचा जबाब नोंदविण्यात आला.