पहिल्या सहामाहीत कर वसुलीत ३२२ टक्क्यांची वाढ

प्रसाद रावकर

मुंबई : करोनामुळे लागू कठोर र्निबधांमुळे विस्कटलेली आर्थिक घडी, आरोग्य व्यवस्थेवर करावा लागलेला प्रचंड खर्च या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेसमोर अर्थसंकट उभे राहिले आहे. मात्र शिथिलीकरणानंतर मुंबई महापालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन विभागाने मालमत्ता कराच्या वसुलीवर लक्ष केंद्रित केले असून विभागाला पहिल्या सहामाहीअखेरीस करदात्यांकडून तब्बल २,२८७.२९ कोटी रुपये वसूल करण्यात यश मिळाले आहे.

मागील वर्षांच्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत यंदा करवसुलीत सुमारे ३२२.४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. असे असले तरीही उर्वरित सहा महिन्यांमध्ये पावणेपाच हजार कोटी रुपये मालमत्ता कर वसूल करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे.

सध्या मोठा महसूल मिळवून देणारा मालमत्ता कर पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत बनला आहे. मागील आर्थिक वर्षांमध्ये (२०२०-२१) मध्ये करोनामुळे आर्थिक घडी विस्कटली होती. त्यामुळे कर वसुलीत मोठी तूट आली. या वर्षांत ६७६८.५८ कोटी रुपये उत्पन्न मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन मालमत्ता करापोटी मिळणारे उत्पन्न ४५०० कोटी रुपये इतके सुधारित करण्यात आले होते. मात्र तेही साध्य करणे अवघड होते.

करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये करनिर्धारण आणि संकलन विभागातील कर्मचाऱ्यांची करोनाविषयक कामांसाठी पाठवणी करण्यात आली होती. त्यामुळे या काळात मालमत्ता कराच्या वसुलीवर परिणाम झाला होता. मात्र करोनाची पहिली लाट ओसरताच या कामातून मुक्त करून कर्मचाऱ्यांना कर वसुलीची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यामुळे सुधारित उद्दिष्ट गाठणे पालिकेला शक्य झाले.

करनिर्धारण आणि संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षांत सुरुवातीपासून कर वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. या वर्षांत सुमारे सात हजार कोटी रुपये कर वसूल करण्याचे उद्दिष्ट असून सहा महिन्यांत २२८७.२९ कोटी रुपये कर वसूल करण्यात यश आले आहे. करोनामुळे मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये केवळ एक कोटी नऊ लाख रुपये करापोटी पालिकेच्या तिजोरीत जमा झाले होते. मागील वर्षांच्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत यंदा १,७४५.७९ कोटी रुपये अधिक वसुली झाली आहे.

मालमत्ता करापोटी पश्चिम उपनगरांतून सर्वाधिक म्हणजे सुमारे १,१०८.७०  कोटी रुपये, शहर भागातून सुमारे ६७२.१९ कोटी रुपये, तर पूर्व उपनगरांतून सुमारे ५०५.१३ कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत.

सुमारे पावणेपाच हजार कोटी वसुलीचे आव्हान

  • चालू आर्थिक वर्षांच्या (२०२१-२२) अर्थसंकल्पात मालमत्ता करापोटी सात हजार कोटी रुपये उत्पन्न मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
  • चालू आर्थिक वर्षांतील १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर या पहिल्या सहा महिन्यांमध्ये २,२८७.२९ कोटी रुपये कर वसूल झाला आहे. मागील वर्षी पहिल्या सहामाहीत केवळ ५४१ कोटी ५० लाख रुपये मालमत्ता कर पालिकेच्या तिजोरीत जमा झाला होता.
  • गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कर वसुलीत ३२२.४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. असे असले तरीही चालू वर्षांतील उर्वरित सहा महिन्यांमध्ये ४,७१२.७१ कोटी रुपये कर वसूल करण्याचे आव्हान करनिर्धारण आणि संकलन विभागासमोर आहे.