मुंबई : मानसिक आजारावरील उपचारांसाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुणीचे मानसोपचारतज्ज्ञानेच लैंगिक शोषण केल्याचा प्रकार बोरिवली परिसरात घडला. संजॉय मुखर्जी (५७) असे या मानसोपचारतज्ज्ञाचे नाव असून मंगळवारी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
बोरिवलीतील राहत्या घरीच त्याने मानसोपचार केंद्र सुरू केले आहे. पीडित तरुणीला २०१८ मध्ये कुटुंबीयांनी मुखर्जी याच्याकडे उपचारांसाठी नेले. पहिल्या भेटीनंतर आठवडय़ाने पीडित तरुणी दुसऱ्यांदा आजोबांबरोबर मुखर्जीकडे उपचारांसाठी गेली. आजोबांना कक्षाबाहेर बसवून उपचारांच्या बहाण्याने मुखर्जीने तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. घाबरलेल्या तरुणीने या प्रकाराची घरच्यांना कोणतीही कल्पना दिली नाही. मात्र त्यानंतर तरुणीची अस्वस्थता वाढल्याने तिचे कुटुंबीय पुन्हा तिला सप्टेंबर २०१८ मध्ये मुखर्जीकडेच घेऊन गेले. त्या वेळाही तिच्यावर अत्याचार करून त्याने चित्रीकरण केले. चित्रीकरण प्रसारित करण्याची धमकी देत त्याने तिच्यावर पुन्हा अत्याचार केल्याने ती तरुणी अधिकच भीतीच्या छायेत वावरू लागली. कुटुंबीयांनी तिला दुसऱ्या महिला मानसोपचारतज्ज्ञाकडे उपचारांसाठी नेले असता, त्यांनी विश्वासात घेऊन संवाद साधला असता हा प्रकार समोर आला.