सत्ता बदलली, आता ‘अच्छे दिन’ येतील अशी आशा हजारो लोकांच्या मनात जागी आहे. मंत्रालयात आपापली कामे घेऊन येणाऱ्यांच्या संख्येलाही तोटा नाही. परंतु सत्ता बदलली तरी मंत्रालयात प्रवेश करण्यासाठीच्या ‘पास’ पद्धतीत अजूनही बदल न झाल्यामुळे दुपारी दोननंतर मंत्रालयाच्या दाराबाहेर रांगा लावून अजूनही लोक ताटकळतच उभे आहेत.
नव्या वर्षांच्या स्वागतासाठी सारेच सज्ज आहेत. मंत्रालयातील कर्मचारीही त्याला अपवाद नाहीत. परंतु गावोगावहून कामासाठी मुंबईत आलेल्यांना याची काय कल्पना असणार. मंगळवारी दुपारी कॅबिनेट म्हणजे मंत्रिमंडळाची बैठक असल्यामुळे मंत्रालयात येणाऱ्यांची गर्दीही मोठी असते. विरोधी पक्षात असताना सरकारच्या मंत्रालय प्रवेशावर टीका करणारी सेना-भाजप आज सत्तेत आहे. विरोधात असताना ‘आम्ही सत्तेत आलो तर जनसामान्यांसाठी मंत्रालयाचे दरवाजे सताड उघडे ठवू’ असे उच्चरवाने याच पक्षांचे नेते सांगत असत. कोणते तरी ओळखपत्र दाखवले की मंत्रालयाच्या दरवाजाशेजारी असलेल्या खिडकीतून प्रवेशपत्र दिले जाते. यात खरे तर कोणती सुरक्षा आहे, असा सवाल मंगळवारी रांगेत ताटकळत असलेल्या साठीच्या भाऊराव पाटलांनी केला. दोननंतर मंत्रालयात प्रवेश मिळतो तेव्हा बरेचसे सनदी अधिकारी घरी जेवायला गेलेले असतात. त्यांच्या विभागातील कर्मचारी पान खात शतपावली करतात हे यापूर्वीच्या सरकारच्या काळातील चित्र होते. ते बदलेल अशी अपेक्षा बाळगणारे गावाकडचे लोक मोठय़ा अपेक्षेने मंत्रालयात येत आहेत. परंतु अद्यापि मंत्रालयात प्रवेश करण्याच्या पद्धतीत काही बदल झालेला नाही की ‘बाबू’ मनोवृत्तीत बदल नाही, अशी या रांगेतील सामान्यांची व्यथा आहे.
मुख्यमंत्री चांगले आहेत. धडाडीने निर्णय घेत आहेत. पण अंमलबजावणीचे काय? मंत्रालयाच्या दारातील रांगा कधी बंद होणार असा सवालही या सामान्य लोकांकडून उपस्थित होताना दिसतो.  सध्या आपल्या गावच्या मंत्र्यांची दालने पाहण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही थोडी नाही. परंतु विरोधी पक्षात असताना दिलेल्या मंत्रालयाचे दरवाजे सताड उघडे ठेवण्याच्या आश्वासनाचे काय झाले, असा सवाल रांगेतल्या सामान्यजनांना पडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Public long queues outside the mantralaya
First published on: 31-12-2014 at 02:09 IST