मुंबई : मणिपूरहून निघालेल्या राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा आज, रविवारी शिवाजी पार्कवरील जाहीर सभेने समारोप होणार आहे. या निमित्ताने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणिशग फुंकले जाईल.
मणिपूरमधून निघालेली राहुल गांधी यांची यात्रा दोन महिन्यानंतर सुमारे ६७०० किमी प्रवास करून दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी या स्मारकस्थळी शनिवारी दाखल झाली. राहुल यांचे मुंबईत जोरदार स्वागत करण्यात आले. धारावीत झालेल्या सभेला प्रियंका गांधी, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आदी उपस्थित होते. राहुल आज, रविवारी मणिभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान अशी पदयात्रा काढणार आहेत.
शिवाजी पार्कवरील सभेच्या माध्यमातून काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या प्रचाराची सुरुवात केली जाईल. या सभेसाठी ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदी उपस्थित राहणार आहेत.
देशात आंतरराष्ट्रीय खंडणीसत्र!
ठाणे : करोना काळात मृतदेहांचा खच पडत होता, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लस कंपन्यांकडून पैसे उकळत होते, असा आरोप काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी शनिवारी ठाण्यात केला. निवडणूक रोख्यांद्वारे मिळवलेल्या पैशांतून महाराष्ट्रातील आघाडी सरकार पाडण्यात आल्याचा आरोप करत देशात आंतरराष्ट्रीय स्तराचे खंडणी सत्र सुरू असल्याची टीका राहुल यांनी केली.
चैत्यभूमीला भेट : राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा शनिवारी मुंबईत दाखल झाली. राहुल यांनी शनिवारी दादर येथील चैत्यभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.