लोकलमधील अपघात प्रामुख्याने लोकलचा फूटबोर्ड आणि फलाटामधील फटीमुळे होत असल्याचे जे सांगितले जात आहे, ते खोटे असून अपघातांसाठी लोकांचा निष्काळजीपणा मोठय़ा प्रमाणावर कारणीभूत असल्याचा दावा मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या व्यवस्थापकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे बुधवारी उच्च न्यायालयात केला. हा दावा सिद्ध करण्यासाठी एक चित्रफीत दाखविण्याची परवानगीही रेल्वेकडून न्यायालयाकडे मागण्यात आली.
घाटकोपर येथे झालेल्या अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरे प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेत स्वत:हून (सुओमोटो) जनहित याचिका दाखल करून घेतली होती. तसेच रेल्वे मंत्रालय, मध्य-पश्चिम रेल्वेच्या व्यवस्थापकांना नोटीस बजावत उत्तर दाखल करण्यास सांगितले होते. बुधवारी दोन्ही रेल्वेंकडून या प्रकरणी उत्तर दाखल करण्यात आले. गुरुवारी या प्रकरणी सुनावणी होणार आहे. रेल्वेची बाजू मांडणारे अ‍ॅड्. सुरेश कुमार यांनी या वेळी रेल्वेचा दावा सिद्ध करणारी चित्रफीत गुरुवारच्या सुनावणीत दाखवू देण्याची विनंती केली.
बहुतांशी अपघात लोकांच्या कमालीच्या निष्काळजीपणामुळे होतात. धावत्या लोकलमध्ये चढू अथवा उतरू नका, लोकलच्या दारामध्ये लटकून प्रवास करू नका, लोकलच्या टपावरून प्रवास टाळा, रूळ ओलांडू नका अशा प्रकारच्या जागरूकता निर्माण करणाऱ्या उद्घोषणा सतत रेल्वेकडून केल्या जातात. परंतु प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करतात आणि बऱ्याच जणांना नाहक आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे केवळ फलाट आणि लोकलच्या फूटबोर्डातील अंतरामुळे अपघात होतात आणि लोकांचे बळी जातात, असे म्हणणे चुकीचे असल्याचा दावा रेल्वेतर्फे करण्यात आला आहे.
 मुंबई विभागीय क्षेत्रात वाहतुकीची जटील समस्या असून उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्यामुळे त्याचा ताण दैनंदिन वाहतुकीवर पडत असतो. परिणामी गर्दीच्या वेळी परिस्थिती फारच भयाण असते, असे रेल्वेतर्फे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. रस्ते वाहतूक ही लोकलच्या तुलनेत महागडी आणि वेळखाऊ असल्याने लोक लोकल प्रवासाला झुकते माप देतात. परिणामी लोकलवर मोठय़ा प्रमाणात ताण पडतो. राज्य सरकारने ही समस्या सोडविण्यासाठी रेल्वेला शक्य ते सहकार्य करण्याची गरज असल्याचा दावाही कुमार यांनी न्यायालयात केला.