लातूर येथील रेल्वेच्या कारखान्यात लवकरच वंदे भारत या सुपरफास्ट एक्स्प्रेस गाड्यांची बांधणी होणार असल्याची माहिती, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. दोन वर्षांपूर्वी हा कारखाना सुरू झाला असला तरीही कोणत्याही मोठ्या प्रकल्पातील रेल्वे गाड्यांची बांधणी अद्यापही होऊ शकलेली नाही. त्यामुळे या कारखान्यातून वंदे भारत गाड्यांचे उत्पादन होणे हे महत्त्वाचे मानले जात असून देशभरातील विविध राज्यात या गाड्या पाठवण्यात येणार आहेत.
हेही वाचा >>>“तुम्ही पत्रकार नाही, शिवसेनेचे प्रवक्ते आहात”, नारायण राणे आणि पत्रकारामध्ये शाब्दिक बाचाबाची, म्हणाले…
मराठवाड्यातील लातूरमध्ये रेल्वे कारखाना उभारण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला. हा कारखाना ३५० एकर जागेत उभारण्यात आला असून या प्रकल्पासाठी ५०० कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला आहे. कारखान्यात मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक यंत्रेही आहेत. वर्षाला २५० डब्यांची निर्मिती होऊ शकते, एवढी कारखान्याची क्षमता आहे. लातूर रेल्वे कारखान्यात २५ डिसेंबर २०२० मध्ये प्रायोगिक तत्त्वावर एका डब्याची निर्मिती करून कारखाना कार्यान्वित करण्यात आला. त्यानंतर तेथे गाड्यांची बांधणी करण्यात आलेली नाही.
हेही वाचा >>>मुंबई: कपड्याच्या कारखान्यात भीषण आग; एका महिलेचा मृत्यू
वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसची बांधणी फक्त चैन्नईतील रेल्वेच्या इंटिग्रल कोच कारखान्यात होत होती. आता यापुढे हरियाणातील सोनिपत, उत्तर प्रदेशमधील रायबरली आणि महाराष्ट्रातील लातूर येथील रेल्वे कारखान्यातही त्याची बांधणी होणार असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी स्पष्ट केले. दोन ते तीन वंदे भारत गाड्यांचे उत्पादन प्रत्येक आठवड्याला होऊन त्या कारखान्याबाहेर पडतील, असेही वैष्णव यांनी सांगितले. वंदे भारत गाड्यांसाठी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पातून रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कामांनाही गती दिली जात असल्याचे वैष्णव यांनी सूतोवाच केले आहे. देशभरातील १ हजार २७५ स्थानकांचा पुनर्विकास केला जात असून यामध्ये मध्य रेल्वेवरील सीएसएमटी स्थानकाचाही समावेश असल्याचे ते म्हणाले.