नवीन फलाट, बायो टॉयलेट, पादचारी पूल, प्रतीक्षालयांचे लोकार्पण
वक्तशीर लोकल प्रवासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याचा दिवस अद्याप दृष्टिपथात नसला तरी, प्रवाशांचे डोळे दिपवणाऱ्या चकचकीत सुविधांचे ‘बुस्टर’ देत रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबईकरांच्या वेदनांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न सोमवारी केला. मुंबईत याआधीच तयार होऊन लोकांच्या वापरात असलेल्या काही प्रकल्पांचे ‘लोकार्पण’ रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते पार पडले.
सात स्थानकांवर वाय-फाय सेवा, हार्बर मार्गावरील १२ डब्यांच्या सेवा, अंधेरी येथे नव्याने बांधलेले दोन फलाट, गोरेगाव येथील उन्नत जागा, आठ पादचारी पूल आणि काही प्रसाधनगृहे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात पहिल्यांदाच सुरेश प्रभू यांनी उपनगरीय रेल्वे समस्या सोडवणे जिकिरीचे असल्याचे कबूल केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वांद्रे, चर्चगेट, दादर ‘वायफाय’
चर्चगेट, वांद्रे, वांद्रे टर्मिनस, दादर (मध्य व पश्चिम), खार रोड, कल्याण आणि लोकमान्य टिळक टर्मिनस अशा आठ स्थानकांवर वाय-फाय सेवा सुरू झाली आहे. ही सेवा विनामूल्य असून पहिल्या अध्र्या तासानंतर वाय-फायचा वेग कमी होणार आहे.

अंधेरीत नवीन फलाट
अंधेरी स्थानकातील फलाट क्रमांक सहा आणि सात पूर्णपणे तोडून हार्बर मार्ग पुढे घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नव्याने उभारलेल्या उन्नत तिकीट खिडकीच्या खाली हे नवीन फलाट तयार करण्यात आले आहेत. हे फलाट प्रवाशांच्या सेवेत आले असून त्यामुळे अंधेरीपर्यंत १२ डब्यांच्या गाडय़ा हार्बर मार्गावर चालवणे शक्य झाले आहे.

हार्बर गोरेगावपर्यंत
हार्बर मार्गाचा विस्तार गोरेगाव स्थानकापर्यंत होणार असून त्यासाठी गोरेगाव स्थानकाच्या पश्चिम दिशेला हार्बर मार्गासाठीचे प्लॅटफॉर्म व स्थानक पूर्ण झाले आहे. त्याच्या वर अंधेरी स्थानकाप्रमाणे उन्नत जागा तयार करण्यात आली असून तेथे तिकीट खिडकी सुरू करण्यात आली आहे.

प्रसाधनगृहे
महालक्ष्मी येथे चार पाश्चात्त्य शैलीतील प्रसाधनगृहे उभारली आहेत. कुर्ला येथे सात पाश्चात्त्य शैलीची शौचालये, महिलांसाठी आठ शैचालये आणि दिव्यांगांसाठी एक शौचालय उभारण्यात आले आहे. तर ठाण्यात पुरुषांसाठी १७ मूत्रकुंड, तीन पाश्चात्त्य शैलीची शौचालये, महिलांसाठी तीन शौचकूप आणि दिव्यांगांसाठी एक शौचकूप उभारण्यात आले आहे.

पादचारी पूल
वसई रोड स्थानकात विरारच्या दिशेला, नालासोपारा स्थानकात विरारच्या दिशेला, कर्जत, शहाड, किंग सर्कल, रे रोड, चेंबूर आणि कुर्ला-कसाईवाडा या ठिकाणी पादचारी पूल उभारण्यात आले आहेत. त्याशिवाय नालासोपारा आणि वसई रोड येथे सरकते जिनेही बसवण्यात आले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway minister suresh prabhu inaugurates many new facilities at mumbai suburban station
First published on: 23-08-2016 at 03:07 IST