लोकलच्या गर्दीत आईपासून दुरावलेल्या एका आठ वर्षांच्या मुलीचा शोध घेऊन तिला तिच्या कुटुंबाकडे सुपूर्द करण्याचे काम रेल्वे यंत्रणेने शुक्रवारी तत्परतेने पार पाडले. प्रणाली झुंजर (वय ८) ही मुलगी आईसोबत दादरहून बदलापूर येथे जात असताना हा प्रकार घडला. प्रणालीच्या हरविण्याचे वृत्त कळल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी तात्काळ मदतीचा हात पुढे करत मुलीचा शोध घेऊन तिची व कुटुंबाची भेट घडवून आणली.
प्रणाली शुक्रवारी आईसोबत बदलापूर येथे जाण्यासाठी निघाली. दादरहून दुपारी ४.४० च्या सुमारास बदलापूर लोकल पकडत असताना प्रचंड गर्दीमुळे प्रणाली आईपासून दुरावली. या गर्दीमुळे प्रणाली लोकलमध्ये राहिली तर तिची आई स्टेशनवर राहिली. आई स्टेशनवरच राहिल्याने प्रणाली गोंधळून गेली. तिची परिस्थिती पाहून एका सहप्रवासी महिलेने मदतीचा हात पुढे केला. त्या महिलेने मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग यांना फोन करून माहिती दिली.
त्यानंतर सिंग यांनी तात्काळ रेल्वे पोलिस, रेल्वे नियंत्रण कक्ष, उद्घोषणा कक्ष, मुलुंडचे स्टेशनमास्तर मुकेश लाल अशा सर्वाना सतर्क केले. माहिती मिळताच मुलुंड रेल्वे पोलिसच्या दोन महिला पोलिसांनी संबंधित गाडीमध्ये शोध घेऊन प्रणालीस सुखररूपपणे मुलुंड स्टेशनवर नेले. तिथे तिची चौकशी करून तिच्या वडिलांशी संपर्क साधण्यात आला. वडिलांनी तात्काळ मुलुंड स्टेशनवर धाव घेतली. त्यानंतर प्रणालीचा ताबा तिच्या वडिलांकडे देण्यात आल्याचे सिंग यांनी सांगितले.