स्वच्छतेचा क्रमांक पटकावणाऱ्या स्थानकांचा प्रत्यक्ष पंचनामा
देशभरातील १०९ उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये मुंबईतील पश्चिम व मध्य रेल्वेवरील अंधेरी, कांदिवली, करीरोड, डोंबिवली अशा अनेक स्थानकांनी स्वच्छ स्थानके म्हणून क्रमवारीत वरचे स्थान पटकावल्याने रेल्वे प्रशासनाची मान उंचावली गेली. परंतु, ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधींनी या स्थानकांची प्रत्यक्ष पाहणी केली असता वेगळेच चित्र दिसून आले. स्थानकांतील फलाट, पूल येथे स्वच्छता दिसत असली तरी, त्याच्या आसपासच्या परिसरातील कचरा, भिंतींवरील पानाच्या पिचकाऱ्या पाहिल्यावर ‘हीच का स्वच्छता’ असा प्रश्न निर्माण होतो. स्थानकांतील स्वच्छतागृहांची अवस्था तर दयनीय असल्याने अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. अर्थात, यात रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष जबाबदार आहेच; पण त्याहीपेक्षा प्रवासीवर्गात स्वच्छतेबाबतची शिस्त नसल्याने ही स्थानके अस्वच्छ असल्याचे दिसून येते.
डोंबिवली स्थानक अस्वच्छच!
उपनगरीय रेल्वे स्थानकांच्या स्वच्छ स्थानकांच्या यादीत देशभरात सातवा क्रमांक पटकाविणारे डोंबिवली स्थानक अस्वच्छतेचे माहेरघर असल्याचेच दिसून येते. फलाटावरील अपंगांच्या स्वच्छतागृहाजवळ अस्वच्छता पसरली आहे. स्थानकाच्या पूर्वेला रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयात शौचालयाचे सांडपाणी थेट पदपथावरून वाहत असल्याचे चित्र आहे. पादचारी पुलांवरून झाडला गेलेला कचरा पुलाच्या शेजारी असलेल्या जागेतच लोटून दिला जातो. स्थानकाच्या
पूर्वेकडील बंद उद्वाहनाजवळ भरपूर कचरा आढळून आला. स्थानकापासून १०० मीटर अंतरावर रुळांलगत परिसरातील झोपडपट्टय़ांतून कचरा फेकण्यात येत असल्याचे दिसून आले.
तिकीट खिडक्यांजवळ कचरा
देशभरात उपनगरीय स्थानकांच्या स्वच्छतेच्या यादीत पश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्थानकाने पहिला क्रमांक पटकावला असला तरीही चित्र नेमके उलट आहे. स्थानकाच्या पूर्व दिशेला असलेल्या तिकीट खिडक्यांजवळ कचरा साचून राहिला होता. तिकीट खिडक्यांजवळ बाजूलाच असलेल्या एका पुलाच्या खाली पत्रे, लोखंड, कागद, प्लास्टिक इत्यादी कचरा मोठय़ा प्रमाणात आढळून आला. रेल्वेने १६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबपर्यंत स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. मात्र अंधेरी स्थानकातील रुळांवर व लगतच्या परिसरात अजूनही कचरा पडून आहे. फलाट क्रमांक एकवर असलेल्या खाद्यपदार्थ स्टॉलमागेच पान खाऊन पिचकाऱ्या मारलेले डाग, फुटलेल्या वाहिन्यांमधून जमलेले सांडपाणी साफ करण्यास पश्चिम रेल्वे विसरलेली दिसते. फलाटांवरील कचऱ्यांच्या डब्यांचीही दुरवस्था झाली आहे.
अग्निरोधक बादल्यांची कचराकुंडी
करीरोड स्थानकात वरकरणी स्वच्छता दिसून येत असली तरी फलाट, भिंती, जिने येथे पानतंबाखूच्या पिचकाऱ्यांचे डाग अस्वच्छतेची साक्ष देतात. रुळांवर प्लास्टिक व इतर कचरा फारसा दिसत नाही. मात्र स्थानकाच्या दोन्ही टोकांना कचरा फेकलेला दिसून येतो. एका टोकाला असलेल्या झाडांमध्ये प्लास्टिक पडलेले दिसून आले. रुळांच्या पलीकडील झाडीत काही प्रमाणात प्लास्टिक व कचरा दिसून येतो. कॅन्टीन, जिन्याच्या खालील जागा तुलनेने स्वच्छ आहे. स्थानकावर काम सुरू असून त्यासाठी आणलेले साहित्यावरील आच्छादन पान-तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी घाण झाले आहे. स्वच्छतागृहाच्या जवळ अग्निरोधक साहित्य ठेवण्यासाठी ज्या बादल्या आहेत, त्यात अग्निरोधक साहित्य तर नाहीच, पण त्या बादल्यांचीच कचराकुंडी झाली आहे.