ऐन गर्दीच्या वेळी सेवा विस्कळीत; प्रशासनाला मात्र ‘काही माहीत नाही’
मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक असलेली मध्य आणि पश्चिम रेल्वेची उपनगरीय सेवा सोमवारी सकाळी अचानक विस्कळीत झाली. विठ्ठलवाडीजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने सकाळी मध्य रेल्वेमार्गावरील गाडय़ा उशिराने धावत होत्या. तर पश्चिम रेल्वेवर अंधेरी आणि बोरिवली या दरम्यान जलद मार्गावर बिघाड झाल्याने या गाडय़ा वेळापत्रकापेक्षा उशिराने धावत होत्या. मात्र दोन्ही रेल्वेच्या प्रशासनांना असे काही झाल्याचे माहीत नव्हते.
मुंबईकडून निघालेली एक मालगाडी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान विठ्ठलवाडी स्थानकाजवळ तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. त्यामुळे मुंबईकडून कर्जतकडे जाणारा मार्ग सुमारे अर्धातास बंद झाला होता. कल्याण स्थानकात कर्जतकडे जाणाऱ्या गाड्यांचा खोळंबा झाला होता. कल्याण स्थानकातील या लोकल गर्दीचा फटका मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील लोकल सेवेलादेखील सहन करावा लागला. या मार्गावरून लोकल सुमारे १५ ते २० मिनिटे उशीराने धावत होत्या.  मध्य रेल्वे प्रशासनाने मात्र अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे सांगितले. त्यातच पारसिक बोगद्याचे काम सुरू असल्याने सकाळच्या ११ वाजताच्या दरम्यान धीमा मार्ग पंधरा मिनिटे बंद करण्यात येतो. या काळात धीम्या मार्गावरील गाडय़ा जलद मार्गावरून धावत असतात. यामुळे या काळात दिवा, मुंब्रा व कळवा मार्गावरील वाहतूकदेखील बंद करण्यात येत असत़े  त्यामुळे प्रवाशांच्या अडचणींत भरच पडली़
पश्चिम रेल्वेवरही बोरिवली आणि अंधेरी या स्थानकांदरम्यान जलद मार्गावरील गाडय़ा उशिराने धावत होत्या. साधारणपणे या दोन स्थानकांमधील अंतर जलद मार्गाने पार करण्यास १५ मिनिटांचा अवधी लागतो. मात्र सोमवारी हेच अंतर पार करण्यासाठी अर्धा तास लागत होता. याबाबत पश्चिम रेल्वे प्रशासनानेही आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगितले. मात्र प्रवाशांना या दिरंगाईचा मनस्ताप भोगावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ठाणे – वाशी’वरील मेगाब्लॉकचाही मनस्ताप
ऑक्टोबरमध्ये आठ दिवसांच्या ट्राफिक ब्लॉकनंतर मध्य रेल्वेने ठाणे-वाशी मार्गावर २० दिवसांतच पुन्हा दुपारी १२ ते १.३० या वेळात मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावर दुपारच्या वेळात गर्दी कमी असते. त्यामुळे रेल्वेने दुपारचा ट्राफिक ब्लॉक घेतला खरा, मात्र अचानकपणे २० गाडय़ा रद्द आणि दीड तास मार्ग बंद करण्यात आल्याने याच वेळात नवी मुंबईकडे जाणाऱ्यांना कुर्ला स्थानकाचा पर्याय उरला. यामुळे पैसे आणि वेळेचा अपव्ययही प्रवाशांना सहन करावा लागत आहे, अशी प्रतिक्रिया उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे नंदकुमार देशमुख यांनी दिली. मध्य तसेच हार्बर मार्गावर यापूर्वी मेगाब्लाक घेण्यात आले आहेत. मात्र, सलग आठ दिवसांचा मेगाब्लॉक कशासाठी, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway travel problem on both wr and cr line
First published on: 26-11-2013 at 02:09 IST