एसी लोकल ट्रेनमधील प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी रेल्वेने आता सेकंड क्लास एसी कोच सुरु करण्याच्या दिशेने हालचाली सुरु केल्या आहेत. सेकंड क्लास एसी कोचमध्ये जास्तीत जास्त प्रवाशांना सामावून घेता येईल यावर भर दिला जाणार आहे. मात्र, इतक्या प्रवाशांना सामावून घेण्याची क्षमता एसी लोकलमध्ये आहे का, असा प्रश्न रेल्वेसमोर निर्माण झाला आहे.
सध्या पश्चिम रेल्वेवर एसी लोकल धावत असून या लोकलच्या दिवसभरात १२ फेऱ्या होतात. मात्र, या लोकलला प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळू शकलेला नाही. एसी लोकलमधील प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी आता एसी लोकलमध्ये फर्स्ट आणि सेकंड एसी असे दोन प्रकार सुरु केले जाण्याची शक्यता आहे. फर्स्ट एसीमध्ये प्रवाशांच्या आसनव्यवस्थेवर भर दिला जाणार आहे. फर्स्ट एसीमध्ये प्रवाशांना आरामात बसून प्रवास करता येईल यावर भर दिला जाणार आहे. तर सेकंड एसीमध्ये जास्तीत जास्त प्रवाशांना सामावून घेण्याचा प्रयत्न असेल. यात प्रवाशांसाठी सीटची संख्या कमी असेल, असे मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे प्रवक्ते संजय सिंह यांनी सांगितले. याला मान्यता मिळाली तर एसी लोकलमध्ये ५० टक्के डबे हे सेकंड एसीचे असतील आणि उर्वरित कोच फर्स्ट एसीसाठी असतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
एसी लोकलमधून ५०० प्रवासी प्रवास करु शकतात. सेकंड एसी कोच ही संकल्पना प्रत्यक्षात आली तर एसी लोकलमधून ७०० प्रवासी प्रवास करु शकतील, असे सूत्रांनी सांगितले. सेकंड एसी कोचमधील रचना मेट्रोसारखी असेल. पण उपनगरीय रेल्वेत हे प्रवाशांसाठी कितपत व्यवहार्य ठरेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मेट्रोमधील प्रवासापेक्षा लोकल ट्रेनमधील प्रवासाचा अवधी जास्त असतो. त्यामुळे प्रवाशांकडून याला कितपत प्रतिसाद देतील, असे रेल्वेतील एका अधिकाऱ्याने सांगितले. तसेच, यात काही तांत्रिक अडचणी देखील असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईतील उपनगरीय रेल्वेमार्गावर संपूर्ण वातानुकूलित गाडी चालवणे व्यवहार्य नसल्याचे लक्षात आल्याने सध्याच्या गाड्यांमध्ये बदल करून त्यांना तीन वातानुकूलित डबे जोडले जातील, अशी घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केली होती. याचीही अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरु आहेत.