विरार ते नालासोपारादरम्यान नालेसफाईची कामे, ‘ड्रोन’द्वारे मार्गाचे सर्वेक्षण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विरार ते नालासोपारा स्थानकांदरम्यान साचलेल्या पाण्यामुळे उपनगरी गाडय़ांची सेवा ठप्प झाल्याच्या गेल्या वर्षीच्या अनुभवातून पश्चिम रेल्वे प्रशासनाने यंदा धडा घेतला आहे. या उपनगरांतील रेल्वेमार्गावर पाणी साचू नये, यासाठी नालेसफाई करणे, उपशासाठी अतिरिक्त पंप बसवणे या कामांसह ड्रोनद्वारे मार्गाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. येत्या सोमवारपासून हे सर्वेक्षण सुरू होणार आहे.

या उपनगरांतील भूअंतर्गत जलप्रवाहाचे सर्वेक्षणही आयआयटी मुंबईमार्फत करण्यात आले असून त्याचा अहवालही रेल्वेला सादर करण्यात आला आहे. त्यानुसारही लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असे पश्चिम रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

जुलै २०१८ मध्ये नालासोपारा, वसई, विरार दरम्यान रुळावर मोठय़ा प्रमाणात पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेवरील उपनगरी सेवा २४ तास ठप्प झाली होती. तर मेल-एक्स्प्रेस गाडय़ांचे वेळापत्रकही कोलमडले होते. या पट्टय़ात साचलेल्या पाण्यामुळे पश्चिम  रेल्वेबरोबरच स्थानिक प्रशासनानेही पावसाळापूर्व कामे केली नसल्याचे समोर आले आणि बरीच टीका झाली. यंदा खबरदारीचे उपाय म्हणून मुंबई महानगरपालिका, मीरा भाईंदर आणि वसई-विरार पालिकेच्या मदतीने पश्चिम रेल्वेने पावसाळापूर्व कामांचे नियोजन केले आहे. यात खासकरून विरार ते नालासोपारा पट्टय़ात विशेष लक्ष देण्यात आले आहे. विरार ते नालासोपारादरम्यान रुळांना समांतर तसेच वसई-विरार खाडीला संलग्न अशा नाल्यांची सफाई करण्यात आली आहे. हे काम ६० टक्के पूर्ण करण्यात आल्याचा दावा पश्चिम रेल्वेने केला आहे. वसई ते विरार दरम्यान तीन भूमिगत नाले तयार केले जात असून ३० मे पर्यंत दोन नाल्यांची कामे पूर्ण केली जातील. याशिवाय आयआयटी मुंबईकडूनही सव्‍‌र्हेक्षण करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

सहा स्थानकात अद्ययावत यंत्रणा

पश्चिम रेल्वेवरील राम मंदिर, महालक्ष्मी, वांद्रे, दहिसर, मीरा रोड, भाईंदर स्थानकात पावसाची अचूक माहिती देणारी स्वयंचलित रेन गेज यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोणत्या भागांत किती पाम्ऊस पडेल आणि किती पडला याची माहिती मिळेल व त्यानुसार उपाययोजना करणे शक्य होणार आहे. हवामान खात्याच्या मदतीने पश्चिम रेल्वे ही यंत्रणा बसवणार आहे.

ऑगस्टपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील नालेसफाई

पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण केली जातात. सध्या चर्चगेट ते विरार दरम्यान ५३ नाले असून यातील ३७ नाल्यांची सफाई करण्यात आली आहे. यातील १६ नाल्यांची सफाई कामे बाकी असून २५ मे पर्यंत ती पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. जून आणि ऑगस्ट २०१९ पर्यंत दुसऱ्या टप्प्यात नालेसफाईची कामे पूर्ण केली जाणार असल्याचे सांगितले.

धोका कुठे?

ग्रॅण्ट रोड, प्रभादेवी, दादर, माटुंगा रोड, माहीम यार्ड, वांद्रे ते खार, अंधेरी ते जोगेश्वरी आणि वसई ते विरार दरम्यान रुळावर पाणी साचण्याचा धोका आहे. त्यानुसार या स्थानकांदरम्यान रुळांची कामे, नालेसफाईची कामे पूर्ण करण्यावर भर दिला आहे. या भागांत १५४ पंप मशिन बसवले जाणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railways to avoid floods
First published on: 10-05-2019 at 00:12 IST