अल्प प्रतिसादामुळे मध्य रेल्वेकडून योजना मागे घेण्याचा निर्णय
उपनगरीय लोकलमधील गर्दीवर उतारा म्हणून मध्य रेल्वेने लोकल प्रवाशांना कूपन काढून लांबपल्ल्याच्या गाडय़ांमधून प्रवास करण्याची सुविधा दिली होती. मात्र प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे अखेर ही योजना मागे घेण्याची वेळ मध्य रेल्वेवर आली आहे. कमी गर्दीच्या वेळेतील एक्स्प्रेसमध्ये प्रवासाची मुभा, कूपन घेण्यासाठी मासिक-त्रमासिक पासाशिवाय कूपन घेण्याची सक्ती आदी कारणांमुळे प्रवाशांनी ही योजना नाकारली आहे.
भावेश नकाते अपघात प्रकरणानंतर अपघात टाळण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी समिती स्थापन झाली होती. गर्दीच्या वेळेत लांबपल्ल्याच्या गाडय़ांमधून उपनगरीय प्रवाशांना प्रवासाची मुभा द्यावी, अशी सूचना या समितीने केली होती. त्यानुसार मध्य रेल्वेने सकाळी महालक्ष्मी, देवगिरी आणि लातूर या तीन एक्स्प्रेस गाडय़ांमधून उपनगरीय प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा दिली होती. मात्र त्यासाठी या प्रवाशांना मासिक व त्रमासिक पासशिवाय कूपन्स विकत घ्यावी लागत होती. द्वितीय श्रेणीचा पास असलेल्यांना कल्याणहून ३० रुपये आणि ठाण्याहून २० रुपयांची, तर प्रथम श्रेणीचा पास असलेल्या प्रवाशांना कल्याणहून २० रुपये आणि ठाण्याहून १० रुपयांची कूप घ्यावी लागत. रेल्वेने या योजनेत महिलांना प्राधान्य दिले होते. मात्र महिलांनी प्रतिसाद न दिल्याने ज्येष्ठ नागरिक आणि त्यानंतर सामान्य प्रवाशांसाठीही ही योजना लागू करण्यात आली.
प्रवाशांची नापसंती
२६ जानेवारीपासून सुरू झालेल्या या योजनेला फेब्रुवारी महिन्यात ९०० कूपन्सच्या पुस्तिकांपैकी फक्त आठ पुस्तिका विकल्या गेल्या होत्या. मार्च आणि एप्रिल महिन्यातही हीच परिस्थिती होती. मध्य रेल्वेवर फक्त १६०० रुपयांची कूपन्स विकली गेली होती. त्यामुळे ही योजना आता बासनात गुंडाळण्यात आल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात आले. उपनगरीय मार्गावरील गर्दी सकाळी साडेसात ते साडेआठनंतर सुरू होते. त्याशिवाय पासशिवाय आणखी पैसे खर्च करून जाण्यासही प्रवाशांनी नापसंती दर्शवल्याने हा उपाय फोल गेल्याचे सांगण्यात येत आहे.