मुंबई : पूर्वमध्य अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून ते २ दिवसांत वायव्येकडे सरकणार आहे. त्यामुळे पुढील २ ते ४ दिवस ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने गेले काही दिवस मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि संपूर्ण राज्यात पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे. दिवाळीतही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती; मात्र कमी दाबाचे क्षेत्र किनाऱ्यापासून दूर गेल्याने कोकण किनारपट्टीवर त्याचा प्रभाव कमी जाणवला होता. आता पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. आठवडाअखेरीस पाऊस कमी होण्याची शक्यता आहे.