एकीकडे मनसेच्या नगरसेवक व नेत्यांचे ‘डबे’ ‘इंजिना’ला सोडून शिवसेना-भाजपमध्ये जात असताना या घसरणाऱ्या डब्यांना सावरण्याचा आटोकाट प्रयत्न मनसेचे नेते करत आहेत. या पाश्र्वभूमीवर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेचे स्थान काय असेल याचा आढावा घेतानाच नवरात्रोत्सवानंतर मुंबईतील मनसेच्या शाखा शाखांना भेट देण्याचे राज ठाकरे यांनी रविवारी जाहीर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनसेचे नेते, उपाध्यक्ष, सरचिटणीस, नेते व विभाग अध्यक्षांसह निवडक पदाधिकाऱ्यांची वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत तसेच त्यापूर्वी मुंबईत मनसेला नेमक्या किती जागा मिळतील तसेच सध्याचे बलाबल काय आहे याचा आढावा घेण्यात आला. या वेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, सेना-भाजप युतीचे नेमके काय होणार याचे चित्र अजून स्पष्ट झालेले नाही. आरक्षणानंतरही अनेक गोष्टी स्पष्ट होतील. त्यामुळे आगामी काळात कोणाबरोबर युती करायची की नाही याचा निर्णयही योग्य वेळी घेतला जाईल. तथापि मतदारसंघनिहाय पक्षबांधणी मजबूत करण्याचा सल्ला देतानाच आपण मुंबईतील प्रत्येक शाखेला भेट देणार असल्याचे राज यांनी जाहीर केले. आजपर्यंत तुम्ही माझे ऐकले आता शाखांवर येऊन कार्यकर्त्यांची भूमिका काय आहे ते मी ऐकणार आहे, असेही राज यांनी स्पष्ट केले. या वेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्यातील मराठा मोर्चाचा आढावा घेतला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray
First published on: 26-09-2016 at 02:21 IST