शिवाजी पार्कवर एका पक्षाला दसरा मेळावा घेण्यास परवानगी देणाऱ्या मात्र पालिका निवडणुकीच्या वेळेस दुसऱ्याला सभा घेण्यास नकार देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर आपण टीका केल्याची कबुली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अवमान याचिकेवरील नोटिशीला उत्तर देताना दिली आहे. मात्र आपण केलेली टीका ही वस्तुस्थितीवर आधारित आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच केल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
निवडणुकीदरम्यान शिवाजी पार्कवर एकाला सभा घेण्यास परवानगी दिली गेली तर उद्या अन्य पक्षही सभेसाठी परवानगी मागतील, असे स्पष्ट करीत मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने मनसेची शिवाजी पार्कवर सभा घेण्यास परवानगी देण्याची याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत या निकालाबाबत नाराजी व्यक्त करून टीकाही केली होती. राज यांनी असे करून न्यायालयाचा अवमान केला आहे आणि त्यांच्यावर त्यासाठी कारवाई करण्याचे आदेश देण्याची मागणी अॅड्. एजाज नक्वी यांनी याचिकेद्वारे केली आहे. महाधिवक्त्यांनी याचिकेस हिरवा कंदील दाखविल्यावर ही याचिका करण्यात आली होती.
आपण केलेल्या टीकेमागे न्यायालयाचा वा अमूक एका न्यायमूर्तीचा अवमान करण्याचा हेतू नसल्याचेही राज यांनी उत्तरात स्पष्ट केले आहे. आपल्या याचिकेवरील निर्णय कायद्यानुसार चुकीचाच होता, या आपल्या वक्तव्यावरही आपण ठाम असल्याचे राज यांनी उत्तरादाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. आपली बाजू मांडताना राज यांनी दावा केला आहे की, न्यायालयाने आपल्या पक्षातर्फे करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली म्हणून आपण निर्णयावर टीका केलेली नाही. तर सारख्याच आशयाच्या याचिकेवर न्यायालय परस्परविरोधी निर्णय कसे काय देऊ शकते, असे करणे म्हणजे समानतेच्या तत्त्वाचे उल्लंघन आहे, याच बाबीचा आधार घेत आपण ही टीका केली होती.
न्यायालयाने सरकारी वकिलांचे म्हणणे न ऐकता स्वत:च्या सारासार बुद्धीला पटेल असा निर्णय द्यावा अन्यथा अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात, असे वक्तव्य आपण केले होते. मात्र त्याचा आपल्या परीने अर्थ लावून त्याबाबतचे वृत्त प्रसिद्धीमाध्यमांनी प्रसिद्ध केल्याचा आरोपही राज यांनी केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Jul 2013 रोजी प्रकाशित
न्यायालयाच्या निर्णयावर टीका केल्याची राज यांची कबुली!
शिवाजी पार्कवर एका पक्षाला दसरा मेळावा घेण्यास परवानगी देणाऱ्या मात्र पालिका निवडणुकीच्या वेळेस दुसऱ्याला सभा घेण्यास नकार देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर आपण टीका केल्याची कबुली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अवमान याचिकेवरील नोटिशीला उत्तर देताना दिली आहे.

First published on: 14-07-2013 at 03:36 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray accepts contempt of court