scorecardresearch

VIDEO: पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे मागे उभे असलेल्या लोकांवर भडकले, म्हणाले, “बाजूला व्हा, पोच…”

मनसे प्रमुख राज ठाकरे त्यांच्या स्पष्टवक्तेपणा आणि आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. याचा अनुभव अनेकदा येतो. असाच एक प्रसंग मुंबईत पत्रकार परिषदेत आला.

VIDEO: पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे मागे उभे असलेल्या लोकांवर भडकले, म्हणाले, “बाजूला व्हा, पोच…”
राज ठाकरे पत्रकार परिषदेत बोलताना (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मनसे प्रमुख राज ठाकरे त्यांच्या स्पष्टवक्तेपणा आणि आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. याचा अनुभव अनेकदा येतो. असाच एक प्रसंग मुंबईत पत्रकार परिषदेत आला. राज ठाकरे कोकण रस्त्यांच्या दुरवस्थेच्या मुद्द्यावर पत्रकारांशी बोलत होते. त्याचवेळी त्यांच्यामागे उभे असलेले लोक बडबड करत असल्याने तो आवाज माईकमध्ये येत होता. त्यामुळे माध्यम प्रतिनिधींनी या लोकांना शांत राहण्यास सांगितले. मात्र, त्यानंतरही ही बडबड सुरूच होती. अखेर राज ठाकरेंनीच संतापून मागे उभ्या असलेल्या लोकांना बाजूला होण्यास सांगितलं.

नेमकं काय घडलं?

राज ठाकरे पत्रकारांशी बोलत असताना त्यांच्या मागे उभे असलेले लोक आपसात बोलत होते. त्यामुळे पत्रकारांनी त्यांना शांत बसण्यास सांगितले. मात्र, बोलणाऱ्यांचं बोलणं सुरूच होतं. अखेर राज ठाकरेच संतापून मागे वळले आणि हात करत बोलणाऱ्यांना ‘बाजूला व्हा’ असं म्हटले. सुरक्षा रक्षकांनीही लोकांना बाजूला जाण्यास सांगितलं. यानंतर राज ठाकरेंच्या मागे उभे असलेले सर्वच लोक बाजूला झाले. पुन्हा पत्रकारांशी बोलताना राज ठाकरेंनी ‘पोच नसते ना त्याची ही लक्षणे’ असं म्हटलं.

कोकण राज ठाकरे म्हणाले, “मी त्या दिवशी दवेंद्र फडणवीसांना भेटलो होतो. त्याच्याशी कोकण रेल्वेबाबत बोलणं झालं. आमचं पुन्हा एकदा बोलणं झालं आणि त्यांनी मला नितीन गडकरींशीही एकदा बोलून घ्या असं सांगितलं. त्या दिवशी रात्रीच मी नितीन गडकरींना फोन केला. ते तेव्हा बंगळुरूला होते. त्यांनी तिकडून परत आल्यावर मला फोन केला.”

“१५-१६ वर्षे होऊनही कोकणाचा रस्ता का होत नाही?”

“गडकरींना मी सांगितलं की, मी आत्ताच कोकणातून आलो आणि मागील अनेक वर्षांपासून कोकणातील रस्त्यांची दुरावस्था आहे. समृद्धी महामार्गासारखा जास्त लांब महामार्ग अतिशय कमी कालावधीत होऊ शकतो, तर मग १५-१६ वर्षे होऊनही कोकणाचा रस्ता का होत नाही? असं मी त्यांना विचारलं,” अशी माहिती राज ठाकरेंनी दिली.

“गडकरी म्हणाले दोन कॉन्ट्रॅक्टर पळून गेले”

राज ठाकरे पुढे म्हणाले, “नितीन गडकरींना मी सांगितलं की त्यांनी व्यक्तिगत लक्ष घातल्याशिवाय तो रस्ता होणार नाही. त्यांनी मला सांगितलं की दोन कॉन्ट्रॅक्टर पळून गेले वगैरे. मी म्हटलं की, या झाल्या सरकारला माहिती असलेल्या गोष्टी. या सबबी जनतेला देऊ शकत नाही.”

हेही वाचा : “राज ठाकरे आमच्याबरोबर आले तर स्वागतच, परंतु…”, शिंदे गटाच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य

“गडकरी आठवडाभरात रस्त्याचं काम कधी सुरू होईल याची माहिती देणार”

“लोकांना रस्ता पाहिजे आहे. आज बघितलं तर सर्वजण पुणे मार्गे गोव्याला जातात, घाटमार्गाने कोकणात उतरतात. यावर त्यांनी तातडीने त्यात लक्ष घालून आठवडाभरात त्या रस्त्याचं काम कधी सुरू होईल याची माहिती देतो म्हणून सांगितलं,” असंही राज ठाकरेंनी नमूद केलं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-12-2022 at 16:50 IST

संबंधित बातम्या