Raj Thackeray Press Conference: मनसेचे नेते राज ठाकरे हे त्यांच्या तडाखेबाज भाषणासाठी आणि कणखर नेतृत्वासाठी ओळखले जातात. तसेच ते श्वानप्रेमीही आहेत. राज ठाकरेंचं श्वान प्रेम हे अनेकदा दिसून आलं आहे. कधी ते आपल्या श्वानाबरोबर शिवाजी पार्कात दिसतात तर कधी प्रवासात एखाद्या अनोळखी श्वानाला जवळ घेऊन कुरवाळतात. त्यांच्या या भूतदयेची प्रचिती आज पुन्हा आली.
राज ठाकरे यांनी गुरूवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. अचानक झालेल्या भेटीमुळे माध्यमांत ही राजकीय भेट असल्याची चर्चा होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले.
माध्यमांना राजकीय बातम्या मिळतील, यामुळे अनेक पत्रकार, कॅमेरामन यांचा ताफा शिवतीर्थवर वळला. पत्रकार परिषद सुरू झाली. राज ठाकरेंनी मात्र फडणवीस यांची भेट राजकीय नसल्याचे स्पष्ट केले. मुंबईतील वाहतूक समस्या, वाहतूक कोंडी आणि वाढत जाणारी वाहने आणि त्यासंबंधी करायच्या उपाययोजना यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे सांगितले.
मध्येच छोटा श्वान पत्रकार परिषदेत आला…
राज ठाकरे पत्रकार परिषदेत बोलत असताना अचानक त्यांचा छोटा श्वान पत्रकार परिषदेत आला आणि राज ठाकरेंच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले. “ये पिल्लू…”, अशी हाक मारत राज ठाकरेंनीही त्याला जवळ बोलावलं. तसा श्वान त्यांच्या जवळ आला आणि त्यांच्याशी लगट करू लागला. राज ठाकरेही प्रेमानं त्याला कुरवाळत होते. तू या माईकएवढा (माध्यमांचे बुम) आहेस, असं ते प्रेमानं त्याला म्हणाले.
श्वानाचं नावही सांगितलं…
यावेळी पत्रकारांनी राज ठाकरेंना त्यांच्या श्वानाचं नाव विचारलं. यावर राज ठाकरे म्हणाले याचं नाव ‘रायनो’.
यानंतर पत्रकारांनी राज ठाकरेंना राज्यात प्राण्यांच्या प्रश्नावरून राजकारण सुरू असल्याचे सांगितलं. कबूतर, हत्ती यानंतर आता भाजपाच्या एका मंत्र्यांनं वराह जयंतीचा मुद्दा काढल्याचा प्रश्न विचारण्यात आला. यावर राज ठाकरे म्हणाले, अशाप्रकारचे विषय आल्यानंतर माध्यमांनी त्याच्या बातम्या दाखवू नयेत. त्यामुळे ज्यांना हे विषय चालवायचे आहेत. प्रसिद्धी मिळाली नाही तर ते असे विषय पुढे आणणारच नाहीत.

तुमच्या घरात उंदीर झाल्यावर काय करता?
राज ठाकरे पुढे म्हणाले, तुमच्या घरात उंदीर आले तर तुम्ही काय करता. त्यांना घराच्या बाहेरच काढता ना… की गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का आपण? मग असे कोण जैन लोक आहेत, जे कबुतरांवर बसून फिरायला जातात. काय करायचे त्या कबुतरांचं? म्हणजे माणसं मेली तरी चालतील पण कबुतरं राहिली पाहिजेत, हा कुठला न्याय? पण हा राजकीय विषय झाला असून सत्ताधाऱ्यांनी तशा प्रकारे तो चालवला.