मनसे प्रमुख राज ठाकरे मिश्किल टोलेबाजीसाठी ओळखले जातात. त्यांच्या याच शैलीमुळे भाषण ऐकणारे पोट धरून हसतात आणि टाळ्यांचा वर्षाव होतो. याची अनुभुती पुन्हा एकदा आली. मुंबईतील मुलुंड येथे महाविद्यालयीन विद्यार्थीनीने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना राज ठाकरेंनी ‘बायको’ या शब्दाचं मूळ सांगताना टोला लगावला. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
राज ठाकरे म्हणाले, “मी एक गोष्ट शोधली. तुम्हाला ऐकूनही नवीनच वाटेल. बायको हा शब्द आपला नाही. बायको हा तुर्की शब्द आहे.” यावर प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थीनीने आम्हाला हे माहिती नव्हतं असं म्हटलं. यावर राज ठाकरेंनी लगेचच “मला बायको असून ही माहिती नव्हती,” असं म्हणत मिश्किल टोलेबाजी केली.
“अशा काही गोष्टी शोधायची मला फार आवड आहे. जे काही मिळेल ते मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. मांडायचा प्रयत्न करत असतो. हेच माझं भाषण असतं, त्यात वेगळं काही नसतं,” असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
हेही वाचा : “माझ्या पूर्ण हाताला मुंग्या येतात, हातपाय थंड पडतात आणि घाम फुटतो, कारण…”, राज ठाकरेंचं मोठं विधान
राज ठाकरे यांचं खरं नाव काय?
खरं नाव काय यावर राज ठाकरे म्हणाले, “यात लपवून ठेवण्यासारखं काहीच नव्हतं. माझे वडील संगितकार होते. माझ्या वडिलांकडे मोहम्मद रफींनी १४ गाणी मराठीत गायली. माझ्या वडिलांची इच्छा होती की, मी संगितात काहीतरी करावं. त्यामुळे त्यांनी माझं पहिलं नाव स्वरराज असं ठेवलं.”
“माझ्या आईचं नाव लग्नात त्यांनी मधुवंती असं ठेवलं”
“माझ्या आईचं नाव लग्नात त्यांनी मधुवंती असं ठेवलं. मधुवंती हा संगितातील एक राग आहे. माझ्या बहिणीचं नाव जयजयवंती ठेवलं, जयजयवंती हाही एक राग आहे. कालांतराने नंतर माझ्या वडिलांना माझा राग कळला. मला राग कुठे येतो, कुठे जातो हे त्यांना समजलं,” असं राज ठाकरेंनी सांगितलं.
हेही वाचा : राज ठाकरेंचं सर्वपक्षीय नेत्यांना पत्र, म्हणाले, “मी अगदी सुरुवातीपासून या मताचा आहे की…”
“एकेदिवशी बाळासाहेब ठाकरेंनी मला बोलावलं आणि…”
राज ठाकरे पुढे म्हणाले, “मी जेव्हा व्यंगचित्र करायला लागलो तेव्हा स्वरराज नावाने व्यंगचित्रं काढायचो. एकेदिवशी बाळासाहेब ठाकरेंनी मला बोलावलं आणि म्हणाले की, त्यांनी त्यांच्या करियरची सुरुवात बाळ ठाकरे नावाने केली आहे. तसेच आजपासून मी राज ठाकरे नावाने करियरची सुरुवात करावी, असं ते म्हणाले. तेव्हापासून माझं नाव राज ठाकरे झालं.”