मुंबई: मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या शहरांमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना त्याकडे लक्ष द्यायला या प्रश्नांची सोडवणूक करायला सरकारला वेळ नाही. जिवापेक्षा सरकारला कबुतरे आणि हत्ती यांसारख्या विषयांमध्ये अधिक स्वारस्य असून जनतेच्या हिताचे आणि विकासाचे मुद्दे बाजूला सारले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी सत्ताधाऱ्यांवर केला. देशासमोरील खरी आव्हाने आणि जनतेच्या गरजांकडे लक्ष देण्याची आवश्यकता असून सरकारने वाहतूक कोडींच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
मुंबईतील वाहतूक कोंडीच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती आणि सह आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे आदी यावेळी उपस्थित होते. या भेटीत शहर नियोजन, वाहतूक समस्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती ठाकरे यांनी या भेटीनंतर दिली.
गेले काही महिन्यांपासून शहर नियोजन आणि वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर आपण मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करीत असून मुंबई परिसरामध्ये पुनर्विकासाची कामे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत. ज्या ठिकाणी आधी ५० लोक राहत होते आता तिथे ५०० लोक राहत आहेत. त्यांच्या गरजा, वाहतूक, गाड्या आणि कचरा सगळेच वाढले आहे. हे सगळे रस्त्यावर आले आहे. त्यामुळे शहराचा बट्याबोळ होत असून त्याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; तर्कवितर्क सुरू
मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकीत उद्धव आणि राज ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत होते.
राज ठाकरे यांनी सकाळी मुख्यमंत्र्यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मुंबईतील वाहतूक व्यवस्थेबाबत ही भेट होती, असे राज ठाकरे यांनी सांगितले. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीचा पार धुव्वा उडाला. त्यानंतर लगेचच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने वेगळे अर्थ काढले जात आहेत. महायुती सरकारच्या हिंदी सक्ती व त्रिभाषा सूत्राच्या विरोधात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. राज ठाकरे यांनी आयोजित केलेल्या मोर्चात सहभागी होण्याची शिवसेना ठाकरे गटाने निश्चित केले होते. पण सरकारने त्रिभाषा सूत्राला स्थगिती दिल्यावर गेल्या महिन्यात वरळीत ठाकरे बंधूंच्या उपस्थितीत जल्लोष सोहळा आयोजित करण्यात आला होता.
तब्बल १८ वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले होते. आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना व मनसेची युती होणार, असा ठाम दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट महत्त्वाची ठरते. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा फटका बसणार आहे.
यामुळेच गेले काही दिवस शिंदे अस्वस्थ आहेत. त्यातच ठाकरे गटातून शिंदे यांच्या पक्षात होणारे पक्षांतरही सध्या मंदावले आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या शक्यतेने शिवसेना व मनसेचे कार्यकर्तेही उत्साहात आहेत. ठाकरे बंधू एकत्र आल्यास होणाऱ्या राजकीय परिणामांचा भाजपकडून सध्या अंदाज घेण्यात येत आहे. भाजपला अनुकूल असे राजकीय पटलावर फासे पडावेत, असे प्रयत्न सुरू आहेत. त्यात राज ठाकरे यांची भूमिका निर्णायक असेल. यामुळेच राज ठाकरे यांच्या खेळीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.