मुंबई :  राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीवरून अनेक तर्कवितर्क आणि राजकीय चर्चेला उधाण आले असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र शुक्रवारी पत्राच्या माध्यमातून धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा असेल तर दोरी मागे ओढावी लागते, यामागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही, असा फडणवीस यांना सबुरीचा सल्ला दिला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा परताल असे वाटले होते, परंतु ते व्हायचे नव्हते, याबद्दल खंत व्यक्त करतानाच उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल राज यांनी अभिनंदनही केले आहे. सध्या सर्वत्र होणाऱ्या पक्षांतराकडेही लक्ष वेधत ठाकरे यांनी पक्षादेश शिरसावंद्य मानून उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतलीत. पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीपेक्षा आकांक्षेपेक्षा मोठा आहे हे कृतीतून दाखवून दिले. पक्षाशी बांधिलकी म्हणजे काय असते त्याचा हा वस्तुपाठच आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवण्यासारखी असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले. तुमचे कर्तृत्व महाराष्ट्रात सिद्ध केले आहे. त्यामुळे देशाच्या भल्यासाठी अधिक काम करण्याची संधी मिळो, अशा शुभेच्छाही राज यांनी दिल्या.