मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचं नवं पोस्टर आता समोर आलं आहे. 23 जानेवारी रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेची उत्सुकता ताणली गेली आहे. या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. अशात विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्यचा असा मजकूर असलेलं पोस्टर लावण्यात आलं आहे. आज सकाळीही एक पोस्टर लावण्यात आलं होतं. ज्यामध्ये राज ठाकरे यांचा उल्लेख महाराष्ट्र धर्म सम्राट असा करण्यात आला होता. विशेष बाब म्हणजे शिवसेना भवनासमोरच हे पोस्टर लावण्यात आलं होतं. त्यापाठोपाठ आता आणखी एक पोस्टर समोर आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज सकाळीच राज ठाकरे यांचं एक पोस्टर समोर आलं होतं. या पोस्टरमध्ये राज ठाकरे यांचा उल्लेख महाराष्ट्र धर्म सम्राट असा करण्यात आला आहे. महाराष्ट्रावर जेव्हा कधी संकट आलं आहे मग ते गोविंदा, गणेशोत्सव यावरचं असो किंवा रझा अकादमीच्या गुंडांनी घातलेला दंगा असो. राज ठाकरे आणि मनसे महाराष्ट्रासाठी उभी राहिली आहे असं या पोस्टरबद्दल संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. त्या पोस्टरनंतर आता नवं पोस्टर समोर आलं आहे. विशेष बाब म्हणजे या दोन्ही पोस्टरच्या मागे भगवा रंग वापरण्यात आला आहे. मनसे आणि भाजपा एकत्र येणार का? या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे 23 जानेवारीच्या मेळाव्यात नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मध्यंतरी दोनवेळा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली. या दोघांमध्ये दोन्ही वेळा सुमारे तासभर तरी चर्चा झाली. या दोन नेत्यांमध्ये एकत्र येण्याबाबत काही बोलणं झालं का? याच्या चर्चा राजकीय वर्तुळात चांगल्याच रंगल्या होत्या. त्या थांबल्या तोच आज एकाच दिवशी दोन पोस्टर समोर आली आहेत. ज्यामुळे या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.

शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करत महाविकास आघाडी स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आणि शिवसेना सेक्युलर झाली अशी एक चर्चा सुरु झाली आहे. आता ही जागा राज ठाकरे भरुन काढणार का? हे पाहण्यासाठी राज ठाकरेंच्या भाषणाची वाट पहावी लागेल. मात्र त्यांची पावलं तरी याच दिशेने वळत आहेत हे काही घडामोडी सांगत आहेत. अशात आता राज ठाकरे काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackerays news poster in mumbai regarding his speech scj
First published on: 17-01-2020 at 19:34 IST