चाळीस वर्षांचा वाद संपुष्टात

मुंबई : 

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते व दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यातील भेटीने आगामी रिपब्लिकन राजकारणाच्या नव्या समीकरणाचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर या भेटीने दोन नेत्यांमधील गेल्या चाळीस वर्षांचा वाद संपुष्टात आला आहे.

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले हे राजा ढाले यांचे शिष्य. ढाले यांच्यामुळे आठवले दलित पँथरमध्ये सहभागी झाले. परंतु पुढे नामदेव ढसाळ व ढाले या दोन प्रमुख नेत्यांमधील वाद विकोपाला गेला. हा वाद भूमिकेचा होता तसाच तो नेतृत्वाचाही होता. या वादातून पँथरमध्ये फूट पडल्यानंतर रामदास आठवले राजा ढाले यांच्याबरोबर राहिले. परंतु पुढे ढाले यांनी दलित पँथर संघटना बरखास्त केली, त्याला आठवले यांनी विरोध केला आणि भारतीय दलित पँथर नावाने ही संघटना सुरू ठेवली. त्यामुळे ढाले यांचा आठवले यांच्यावर राग होता. मधल्या काळात दोन वेळा रिपब्लिकन ऐक्याच्या निमित्ताने सर्व दलित नेते एकत्र आले होते, परंतु ढाले व आठवले यांचे कधीच मनोमीलन झाले नाही.

मात्र सोमवारी रामदास आठवले यांनी घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरमधील ढाले यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. अर्थात ही भेट पूर्वनियोजित होती. या वेळी मुंबई रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष गौतम सोनावणे, काकासाहेब खंबाळकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

राजा ढाले यांच्यामुळे आपण दलित पँथरमध्ये आलो आणि नेता झालो, अशी कबुली आठवले यांनी दिली. तर राजकारणात कोणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो, आपण सगळे आंबेडकरवादी एकच आहोत, संधीसाधूंना चळवळीतून हद्दपार केले पाहिजे, असे मनोगत ढाले यांनी व्यक्त केले.  ढाले-आठवले भेटीने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे, असे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.