एकाच क्षेत्रातील समव्यावसायिकांची एकमेकांमध्ये व्यावसायिक स्पर्धा असते, पण मराठी प्रकाशन व्यवसायात सध्या जिव्हाळ्याची बेटे फुलली आहेत. मराठीतीलच काही मातब्बर प्रकाशकांनी आपल्याच व्यवसायात असलेल्या एका मातब्बर लेखकाची पुस्तके प्रकाशित केली आहेत. प्रकाशन व्यवसायातील ही ‘माया’ आणि ‘जिव्हाळा’ आगळा ठरावा. पॉप्युलर प्रकाशन या संस्थेचे सर्वेसर्वा रामदास भटकळ यांची दोन पुस्तके ‘मौज प्रकाशन’ ने तर एक पुस्तक ‘राजहंस प्रकाशन’ या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आहे. राजहंसतर्फेच भटकळ यांची आणखी दोन नवीन पुस्तके लवकरच प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. तर लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेने भटकळ यांनी लिहिलेले ‘जगदंबा’ हे नाटक प्रकाशित केले आहे.
प्रकाशक असलेल्या भटकळ यांचे ‘जिप्सॉ’ हे पहिले पुस्तक १९९७ मध्ये ‘राजहंस’ने प्रकाशित केले. तर मौज प्रकाशनाने भटकळ यांचे ‘मोहनमाया’ हे पुस्तक काही वर्षांपूर्वी प्रकाशित केले होते. ‘मौज’नेच भटकळ यांचे ‘रिंगणाबाहेर’हे पुस्तक नुकतेच प्रकाशित केले आहे. ‘राजहंस’कडून भटकळ यांची ‘जिव्हाळा’ आणि अन्य एक पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
या संदर्भात ‘मौज प्रकाशन’ संस्थेचे संजय भागवत यांनी सांगितले की, पॉप्युलर आणि आमच्यात कोणतीही व्यावसायिक स्पर्धा नाही. ‘पॉप्युलर’च्या सुरुवातीच्या काळात त्यांची काही पुस्तके आमच्या मुद्रणालयात छापली गेली तसेच काही पुस्तकांवर संपादकीय संस्कार स्वत: श्री. पु. भागवत यांनी केले होते. त्यामुळे आमचे जुने ऋणानुबंध आहेत. एक उत्तम लेखक म्हणूनच भटकळ यांची ही दोन्ही पुस्तके आम्ही प्रकाशित केली असून एखादा चांगला विषय त्यांच्याकडे असेल तर यापुढेही भटकळ यांची पुस्तके आमच्याकडून प्रकाशित केली जातील.
तर स्वत: रामदास भटकळ यांना विचारले असता ते म्हणाले की, राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर आणि आमचे स्नेहाचे संबंध आहेत. १९७० पासून मी त्यांच्या ‘माणूस’ या साप्ताहिकात विविध विषयांवर लेखन केले होते. त्यातील काही निवडक लेखांचे पुस्तक ‘जिप्सॉ’ या नावाने त्यांनी प्रकाशित केले. आता लवकरच आणखी दोन पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.