मुंबई : आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना पालिकेच्या विभाग कार्यालयाने पुन्हा एकदा नोटीस पाठवली आहे. खार येथील निवासस्थानात मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी राणा दाम्पत्याने दिलेले स्पष्टीकरण मुंबई पालिकेने अमान्य केले आहे. त्यानुसार राणा यांना सात दिवसांची नोटीस  दिली आहे.

खार येथील १४ वा रस्ता येथील लाव्ही इमारतीत आठव्या मजल्यावर राणा दाम्पत्याचे घर आहे. पंधरा दिवसांपूर्वी पालिकेच्या एच पश्चिम  विभाग कार्यालयाचे पथक निवासस्थानाची पाहणी करण्यासाठी गेले असता घरात अनधिकृत बांधकामे असल्याचे पथकाला आढळून आले होते. या पाहणीनंतर पालिकेने १० मे रोजी राणा दाम्पत्याला सात दिवसांची नोटीस पाठवली होती.

इमारत प्रस्ताव विभागाने २००७ मध्ये मंजूर केलेल्या आराखडय़ात मोठय़ा प्रमाणावर बदल करण्यात आल्याचे या नोटिसीत म्हटले होते. या बदलांसंदर्भात काही परवानग्या घेतलेल्या असल्यास त्या सादर करण्याकरिता सात दिवसांची नोटीस देण्यात आली होती. त्याला राणा दाम्पत्याच्या वतीने १९ मे रोजी उत्तर देण्यात आले आहे. मात्र त्यांनी दिलेले उत्तर पालिकेने अमान्य केले आणि पुन्हा एकदा सात दिवसांची नोटीस पाठवली.  राणा यांनी सादर केलेल्या कागदपत्रांवरून हे बांधकाम अधिकृत असल्याचे सिद्ध होत नाही, असे नव्या नोटिशीत म्हटले आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकाम सात दिवसांत काढून टाकण्याबाबत नोटिसीद्वारे निर्देश देण्यात आले आहेत.