दोन महिन्यात तीन लाखांहून अधिक पर्यटकांची हजेरी, तिजोरीत सव्वाकोटी रुपयांची भर

मुंबई : मुंबापुरीच्या पर्यटनस्थळांमध्ये महत्त्वाचे स्थान असलेल्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाकडे (राणीची बाग) पुन्हा एकदा पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. शिथिलीकरणानंतर खुल्या झालेल्या राणीच्या बागेला गेल्या दोन महिन्यात तीन लाख ३० हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे.  राणीच्या बागेतील प्रवेश शुल्काच्या माध्यमातून पालिकेच्या तिजोरीत सव्वाकोटी रुपयांहून अधिक महसूल जमा झाला आहे.

पालिकेने राणीच्या बागेच्या नूतनीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत राणीची बाग कात टाकू लागली आहे. आधुनिक तंत्रज्ञान, देश-विदेशातील प्राणिसंग्रहालयांचा अभ्यास आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन याच्या आधारावर नव्याने बांधण्यात आलेले िपजरे आणि सुशोभीकरण यामुळे पर्यटकांची पावले राणीच्या बागेकडे वळू लागली आहेत. त्यातच राणीच्या बागेचे रुपडे बदलल्यापासूनच पर्यटकांचा प्रतिसादात वाढू लागला आहे. टाळेबंदीमध्ये घरात अडकलेले नागरिक शिथिलीकरणानंतर बाहेर पडू लागल्याने राणीच्या बागेत पर्यटकांची प्रचंड गर्दी होऊ लागली आहे.

 शिथिलीकरणानंतर १ नोव्हेंबरला राणीची बाग पर्यटकांसाठी खुली झाली. त्यानंतर अवघ्या २० दिवसांमध्ये सव्वालाख पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली होती. नोव्हेंबर अखेर एकूण एक लाख ६८ हजार ४३० पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली होती. १ ते ३० नोव्हेंबर दरम्यान ६८ लाख ६०० रुपये इतका म्हसूल पालिकेला मिळाला. तर १ डिसेंबर ते २७ डिसेंबर या कालावधीत एक लाख ६५ हजार ७१४ पर्यटकांनी राणीच्या बागेत हजेरी लावली असून या काळात प्रवेश शुल्कापोटी पालिकेला ६६ लाख ९८ हजार ९२५ रुपये इतका महसूल मिळाला. नाताळाच्या सुट्टीमुळे राणीच्या बागेत मोठय़ा संख्येने पर्यटक येतील अशी उद्यान प्रशासनाला अपेक्षा आहे. एकेकाळी पर्यटकांअभावी ओस पडलेली राणीची बाग सध्या पर्यटकांच्या गर्दीने बहरून गेली आहे.

पक्षी दालनात विशेष गर्दी

 राणीच्या बागेतील हम्बोल्ट पेंग्विन आणि वाघ पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरले आहेत. रणथंबोर किल्ल्याची प्रतिकृती असलेल्या िपजऱ्यातील ‘शक्ती’ वाघ आणि ‘करिष्मा’ वाघिणीला पाहण्यासाठी पर्यटक गर्दी  करत आहेत. यासोबतच नव्याने खुले झालेले पक्षी दालनही पर्यटकांच्या पसंतीला उतरले आहे. वन्य अधिवासातील या पक्ष्यांना काचेतून पाहता येते. यामध्ये धनेश, लांडोर, गोल्डन फेजन्ट, पोपटांचे विविध प्रकार, मिलिटरी मकाऊ, आफ्रिकन ग्रे पॅरेट, कॉकिटेल आदी अनेक पक्ष्यांचा समावेश आहे.