वीज खात्यातील भ्रष्टाचारावरुन अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला टीकेचे लक्ष्य करणा-या ‘आम आदमी पक्षा’च्या कार्यालयाची शनिवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. अंधेरीतील चकाला येथे ‘आम आदमी पक्षा’चे कार्यालय असून शनिवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ‘आप’च्या कार्यालयात शिरले. संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयातील सामानाची तोडफोड केली. तसेच यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केजरीवाल यांची पोस्टर्सही फाडली. या हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान तोडफोड करणा-या राष्ट्रवादीच्या २० ते २५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आम आदमी पक्ष’ आक्रमक झाला असून पक्षाच्या राज्यातील प्रभारी अंजली दमानिया यांनी दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. महावितरण व महाजनकोमध्ये सुमारे २२ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. दरम्यान या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी  राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यासाठी गेलेले ‘आप’चे कार्यकर्ते मयांक गांधी यांनासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.