राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नुकतेच सत्तेचे अडीच वर्षे पूर्ण केले आहेत. मात्र अद्यापही तिन्ही पक्षांपमध्ये धुसफूस कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. असे असले तरी तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेते सर्व काही ठिक असल्याचे कायम सांगत आले आहेत. अशात आता मुख्यमंत्री पदाबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक विधान केले आहे. यावरुन आता महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाष्य केले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मुख्यमंत्री पदासंदर्भात काय चर्चा झाली मला माहिती नाही. पण मुख्यमंत्री पदी बदल करण्याची कोणतीही चर्चा महाविकास आघाडीमध्ये नाही. उद्धव ठाकरे हेच पुढचे अडीच वर्षे मुख्यमंत्री राहतील अशी भूमिका याआधीही महाविकास आघाडीने जाहीर केलेली आहे. त्यामध्ये आजच्या तारखेला काही बदल होण्याचा प्रश्न उद्भवत नाही,” असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

“रश्मी ठाकरे यांना राजकारणाचा…”; महिला मुख्यमंत्री पदावरुन सुप्रिया सुळेंना अब्दुल सत्तारांचे प्रत्युत्तर

महिला मुख्यमंत्री करायच्या असतील तर रश्मी ठाकरे सुसज्ज – अब्दुल सत्तार</strong>

मंत्री अब्दुल सत्तार यांनी बोलताना २५ वर्षानंतर सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्री पदी नंबर लागावा प्रार्थना आहे, असे म्हटले. “महिला मुख्यमंत्री करायच्या असतील तर रश्मी ठाकरे सुसज्ज आहेत. त्यांना राजकारणाचा अभ्यास आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी महाराष्ट्राच्या तमाम मंदिरांमध्ये आधीच पूजा झालेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे २५ वर्षे मुख्यमंत्री पदी राहतील. सुप्रिया सुळे मुख्यमंत्री कोणत्या तारखेला होणार याबद्दल मी बोलणं योग्य होणार नाही. २५ वर्षानंतर त्यांचा नंबर लागावा हीच ईश्वरकडे आमची प्रार्थना आहे,” असे अब्दुल सत्तार म्हणाले.

उद्धव ठाकरे २५ वर्ष मुख्यमंत्री राहतील असं सुप्रिया सुळेंचं म्हणणं – संजय राऊत

“उद्धव ठाकरे सध्या मुख्यमंत्री असून हेच २५ वर्ष मुख्यमंत्री राहतील असं सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असे संभ्रम काही लोक निर्माण करत असतात. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सोनिया गांधी, राहुल गांधी हे सर्वजण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर आनंदी आहेत. त्याच्यामुळे कोणी प्रश्न निर्माण केला असेल तर त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे,” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

यावेळी बोलताना गृहमंत्र्यांनी राणा दाम्पत्याने लोकसभा अध्यक्षांकडे केलेल्या तक्रारीबाबतही भाष्य केले. “संसदेच्या हक्कभंग समितीने राणा दाम्पत्याच्या तक्रारीनंतर नोटीस दिली आहे. या समितींचा नेहमीच आदर ठेवून आपले म्हणणे मांडले जाते,” असेही वळसे पाटील म्हणाले.

“नोटाबंदीच्या वेळेस महागाईचे सुद्धा कारण दिले होते. आज रिझर्व्ह बॅंकच बनावट नोटांची संख्या वाढल्याचे जाहीर करत असेल तर मला वाटतं केंद्र सरकारच्या धोरणात मोठी चूक झाली आहे. त्यासंदर्भात केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट केली पाहिजे,” असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reaction of dilip walse patil after supriya sule statement about becoming the chief minister of ncp abn
First published on: 31-05-2022 at 12:16 IST