ब्लॉग बेंचर्स विजेत्या जितेश दळवीची भावना
समाजमाध्यमांवर व्यक्त होण्यापेक्षा वर्तमानपत्र हे व्यक्त होण्यासाठीचे मोठे माध्यम आहे, म्हणून सगळ्यांनी वर्तमानपत्रेही वाचली पाहिजेत, असे मत ‘ब्लॉग बेंचर्स’ उपक्रमात प्रथम पारितोषिक मिळवलेल्या सेठ जी. एस. वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी जितेश दळवी याने व्यक्त केले. जितेशने ‘दे रे कान्हा’ या अग्रलेखावर आपले मत मांडले होते.‘ सध्या होणाऱ्या भावनिक आवाहनांकडे आपण दुर्लक्ष केले पाहिजे. त्यासाठी वाचन वाढविणे अपेक्षित असून वर्तमानपत्रांचे नियमित वाचन करण्याची आवश्यकता त्याने बोलून दाखविली.
‘लोकसत्ता’चा ‘ब्लॉग बेंचर्स’ हा चांगला उपक्रम असून विद्यार्थ्यांना या उपक्रमात व्यक्त होण्याची चांगली संधी मिळाली आहे, असे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

‘ग्रामीण भागातील युवकांसाठी उत्तम व्यासपीठ’
कोल्हापूर : ग्रामीण भागातील युवकांना मत मांडण्यासाठी व्यापक व्यासपीठ मिळत नाही. ‘लोकसत्ता’च्या ‘ब्लॉग बेन्चर्स’ने ही उणीव भरून काढली आहे. किंबहुना या उपक्रमामुळेच मला माझे मत मांडता आले आणि ते ‘लोकसत्ता’च्या रूपाने संपूर्ण राज्यभर गेले, असे मत या उपक्रमात द्वितीय क्रमांक मिळवलेल्या विनायक घोरपडे याने व्यक्त केले.
कोल्हापूरजवळील ‘जेनेसिस कॉलेज ऑफ टेक्नोलॉजी’मध्ये विनायक घोरपडे ‘मेकॅनिकल इंजिनिअिरग’च्या द्वितीय वर्षांमध्ये शिकतो आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य एन. व्ही. पुजारी यांच्या हस्ते विनायकला स्पर्धेचे प्रमाणपत्र आणि पाच हजार रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले .
mum02विनायक म्हणाला, की या बक्षिसामुळे आता माझा आत्मविश्वास वाढला आहे. बहिणीप्रमाणे स्पर्धा परीक्षेत उतरून यश मिळवण्यासाठी मला ‘लोकसत्ता’ हाच खरा आधार वाटत आहे. एखाद्या विषयावर ग्रामीण भागातील तरुण तपशीलवार विचार करतात, या तरुणांना हा उपक्रम नक्कीच मार्गदर्शक असल्याचेही शेवटी तो म्हणाला.

विनायक मूळचा आजरा तालुक्यातील उत्तूर गावाचा. या छोटय़ा खेडेगावात आधुनिक सुविधा खूपच कमी. लहानपणी तर वृत्तपत्र मिळणेही कठीण होते. तरीही त्याला वृत्तपत्र, मासिके वाचण्याचा छंद जडला. वाचकांच्या पत्रातून त्याने आजवर अनेक विषय मांडले आहेत. त्याच्या दोन्ही बहिणी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत. त्यांच्या आग्रहामुळे त्याला ‘लोकसत्ता’ वाचण्याची सवय जडली. यातूनच त्याने या स्पर्धेत भाग घेतला.