कुठे डेरेदार वृक्षाखाली वाचन कट्टय़ाची सुरुवात तर कुठे वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित पुस्तकांच्या गर्दीत ललित पुस्तकांच्या दालनाचे उद्घाटन.. कुठे कवितेवरच्या गप्पा तर कुठे पुस्तकांच्या भेटीमुळे रोवला गेलेला ग्रंथालयाचा पाया.. आपल्या लेखणीतून अख्ख्या भारताला उत्तुंग स्वप्न पाहण्याचे बळ देणाऱ्या भारताच्या माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी साजऱ्या करण्यात आलेल्या पहिल्यावहिल्या ‘वाचन प्रेरणा दिना’चे स्वागत महाराष्ट्रभर झाले ते अशा उत्साहात.
कलामांना ‘सलाम’ करण्याच्या उद्देशाने १५ ऑक्टोबर हा दिवस ठिकठिकाणी ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. खुद्द शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मुंबईतील वसई, नालासोपारा, मालाड येथील काही शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. येथील शाळांमधील विद्यार्थ्यांना त्यांनी पुस्तक पेटी भेटीदाखल दिली. तसेच वाचनामध्ये आयुष्य बदलण्याचे सामथ्र्य असल्याचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. काही ठिकाणी त्यांनी कवितांचे वाचनही केले. आपण वाचलेल्या पुस्तकांची माहिती देण्याबरोबरच त्यांना भावलेल्या शंकरराव खरात यांच्या ‘तराळ-अंतराळ’ या पुस्तकामधील एक भावस्पर्श प्रसंगही सांगितला.
मालाडच्या मनोरी येथील ‘ज्ञानसाधना विद्यालया’त वाचन कट्टय़ाचे उद्घाटन करण्यात आले. एका डेरेदार वृक्षाखाली हा वाचनकट्टा तयार करण्यात आला आहे. मराठी भाषा विभागामार्फत मंत्रालयातील आवारातही ग्रंथ प्रदर्शन आयोजिण्यात आले होते. या शिवाय सोफिया, रूपारेल, विल्सन महाविद्यालयात लेखक सुदीप नगरकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात अनेक दुर्मिळ पुस्तकांची मोठय़ा प्रमाणावर विक्री झाली.
दरम्यान राज्यभरात शाळा-महाविद्यालयांमध्ये वाचन प्रेरणा दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पुण्याच्या बी.जे. मेडिकल महाविद्यालयात पुस्तक प्रदर्शनाबरोबरच शास्त्रज्ञ डॉ. योगेश शौचे, अर्थतज्ज्ञ भरत पाठक, डॉ. अविनाश भोंडवे व हिमांशु वझे यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी ग्रंथालयात ललित साहित्याचे दालन उघडण्यात आले.
बारामतीच्या टी.सी. महाविद्यालयात डॉ. सदानंद मोरे यांचे व्याख्यान झाले. शाळा-महाविद्यालयांध्ये असे कार्यक्रम रंगले असताना एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी वाचन प्रेरणेकरिता ‘हटके’ उपक्रम राबविला.