मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या मँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीकडून लाल रंग फेकण्यात आल्याने तणाव निर्माण झाला. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही बाब निदर्शनास येतात शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप पसरला. दादर-माहीम परिसरातील शिवसैनिकांनी (ठाकरे) शिवाजीपार्क येथे धाव घेत पुतळ्याची व परिसराची स्वच्छता केली. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पुतळ्याच्या ठिकाणी भेट देत पाहणी केली. महाराष्ट्र पेटविण्याचा हा डाव असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
शिवाजी पार्क परिसरात नेहमीप्रमाणे नागरिकांना प्रभातफेरीदरम्या माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लालरंग फेकल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, आमदार महेश सावंत, माजी महापौर किशोरी पेडणेकर, महादेव देवळे, उपनेत्या विशाखा राऊत, विभागप्रमुख, शाखाप्रमुख तसेच कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर आदी नेतेमंडळीही या ठिकाणी पाेहोचली.
शिवसैनिक व मनसे कार्यर्त्यांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत असताना पोलिसांनी तत्काळ शिवाजी पार्क परिसरात बंदोबस्त वाढवला व परिस्थिती नियंत्रणात राखली. शिवसैनिकांनीही थिनरच्या सहाय्याने पुतळ्यावर तसेच पुतळ्याशेजारी पडलेल्या रंगाची स्वच्छता केली. रात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटककडून हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
या घटनेबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित व्यक्तीचा शोध घेतला जात. न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) पथकाकडूनही परिसराची पाहणी करण्यात आली. हा लाल रंग नेमका कोणी टाकला याचा तपास पोलिसांकडून केला जात असून यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.
हा प्रकार उघडकीय येताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुतळ्याच्या ठिकाणी धाव घेऊन पाहणी केली. विशेष म्हणजे २००६ मध्येही मीनाताईंच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. आताही पुन्हा एकदा असाच प्रकार घडल्याने शिवसैनिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांकडून माँसाहेब अमर रहे…अशा घोषणा देण्यात आल्या.
महाराष्ट्र पेटवण्याचा डाव – उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी दुपारी शिवाजीपार्क परिसरात भेट देत शिवसैनिकांकडून माहिती घेतली. हा निंदनीय प्रकार असून ते करणाऱ्या दोनच वृत्ती असू शकतात. एक म्हणजे ज्यांना आपल्या आईवडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते अशा बेवारस माणसाचे हे कृत्य असेल किंवा बिहारमध्ये पंतप्रधान मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान झाला त्यामुळे बिहार बंद करण्याचा जो असफल प्रयत्न झाला, अशा कुणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा हा डाव असू शकतो, असा आरोप ठाकरेंनी केला. अठरा वर्षांपूर्वीही असेच घडले होते शिवसैनिकांच्या भावना तेव्हाही तीव्र होत्या आजही आहेत, पण तूर्त आम्ही सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी पुतळ्याची पाहणी केल्यानंतर सांगितले.
समाजकंटकाला पोलीस शोधून काढतील – देवेंद्र फडणवीस
अशाप्रकरची घटना निषेधार्ह आहे. ज्या कुठल्या समाजकंटकांनी हे कृत्य केले आहे, त्याला पोलीस शाधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील. त्यापेक्षा जास्त याला राजकीय रंग देणे मला योग्य वाटत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
कोणालाही सोडले जाणार नाही – एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावर तीव्र संताप व्यक्त केला. ही घटना अतिशय निंदनीय आहे, कोणालाही सोडले जाणार नाही. यासंदर्भात स्वत: पोलीस आयुक्तांशी बोललो असून मुख्यमंत्र्यांनी देखील लक्ष घालत आहे. कोणत्याही परिस्थितीत समाजकंटकाला सोडले जाणार नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
जुलै २००६ साली घडली होती अशीच घटना
शिवसैनिकांच्या मॉंसाहेब स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या निधनानंतर १९९५ साली शिवाजीपार्क प्रवेशद्वारावर त्यांचा पुतळा उभारण्यात आला. ८ जुलै २००६ रोजी अज्ञात व्यक्तीकडून काळा रंग फासत पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न झाला. याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते. महामार्गांवर वाहनांच्या चाकांची जाळपोळ, रास्ता रोको, सरकारी बसची तोडफोड करण्याचे प्रकार झाले. मुंबईत तणाव इतका वाढला होता की ‘मुंबई बंद’ झाली होती. ८ आणि ९ जुलै सलग दोन दिवस संतप्त शिवसैनिकांनी मुंबई बंद पाडली होती.