मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरात टॅक्सी वाहतुकीत सुधारणा व्हावी म्हणून शासन प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून रद्द करण्यात आलेल्या सात हजार ८४४ परवान्यांचे वाटप फोन फ्लीट टॅक्सीसाठी निविदा पद्धतीने करण्यात येणार आहे. महिला चालक टॅक्सीसाठी १०० परवाने राखीव असून त्यासाठीच्या किमान बोली शुल्कात मोठी सूट देण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी घेतला. महिला चालक टॅक्सीसाठी हे शुल्क एक लाख ५० हजार रुपये इतके तर इतर लायसन्स धारकासाठी हे मूल्य तीन लाख रुपये असे राहील.
मुंबईतील रद्द टॅक्सी परवाने एकूण १९ हजार ६८७ असून, यापैकी २०१० मध्ये एसएमएस टॅक्सीकॅब या कंपनीला चार हजार परवाने लिलावाने वाटप केले होते. त्यामुळे सध्या १५ हजार ६८७ परवाने उपलब्ध असून, यापैकी ५० टक्के म्हणजे सात हजार ८४४ परवाने हे काळ्या-पिवळ्या टॅक्सीसाठी फेरवाटप करण्यात येतील. हे परवाने वितरित करताना प्रत्येक निविदाकारास किमान १०० किंवा कमाल २५०० परवान्यांकरिता बोली करता येईल.
२० जानेवारी २०१० रोजी चार हजार परवाने फोन फ्लीट टॅक्सी योजनेंतर्गत देण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर १४ ऑगस्ट २०१३ रोजी एका अधिसूचनेन्वये हरकती व सुचना मागविण्यात आल्या होत्या. त्याला अनुसरून अंतिम नियमावली तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Redistribution of taxi license in mumbai
First published on: 20-11-2013 at 06:22 IST