scorecardresearch

मुंबई: दुर्लक्षित १८ तलावांची महानगरपालिकेकडून डागडुजी

आता स्वच्छ भारत अभियानांतर्गत तलावांची दुरुस्ती, स्वच्छता, संवर्धन आणि सुशोभिकरणाचा प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.

मुंबई: दुर्लक्षित १८ तलावांची महानगरपालिकेकडून डागडुजी
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत साफसफाई, सुशोभिकरण करणार

प्रसाद रावकर

मुंबई: गेली अनेक वर्षे दुर्लक्षित असलेल्या मालाड, मालवणी, मनोरी आणि आसपासच्या परिसरातील सुमारे १८ पैकी बहुसंख्य तलावांची वाताहात झाली असून यापैकी १५ तलाव राज्यसरकारच्या तर तीन तलाव मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित आहेत. आता स्वच्छ भारत अभियानांतर्गत या तलावांची दुरुस्ती, स्वच्छता, संवर्धन आणि सुशोभिकरणाचा प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.

मालवणी, मढ आणि मार्वे परिसरातील कांदळवन क्षेत्रातील वाढत्या अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून अतिक्रमणामुळे होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास नवी डोकेदुखी होऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वी उपनगर जिल्हाधिकारी मंगलप्रभात लोढा यांनी या परिसराची पाहणी करून मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महानगरपालिकेने मालाड (पूर्व-पश्चिम), मालवणी, मनोरी आणि आसपासच्या परिसरातील १८ तलावांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यापैकी १५ तलाव राज्य सरकारच्या अखत्यारित आहेत. काही प्रकल्प जिल्हाधिकारी, तर काही तलाव म्हाडाच्या अखत्यारित आहेत. उर्वरित तीन तलाव मुंबई महानगरपालिकेचे आहेत.

हेही वाचा >>> लिपिक, टंकलेखक पदांसाठी जानेवारीत जाहिरात

स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबईत सध्या विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या अभियानाचा एक भाग म्हणून आता या १८ तलावांची स्वच्छता, संवर्धन आणि सुशोभिकरण करण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या पी-उत्तर विभागाने केला केला. त्यासाठी या तलावांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. काही तलावांची छोटी-मोठी डागडुजी करावी लागणार आहे. काही तलावांमध्ये साचलेला गाळ उपसावा लागणार आहे. त्यानंतर लगतच्या परिसराचे सुशोभिकरण करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे.

हेही वाचा >>> मुंबईमध्ये गोवरचा आणखी एक बळी

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने आपल्या अखत्यारितील मालाड पूर्व येथील शांताराम तलाव, मालाड पश्चिम परिसरातील मालवणी गावातील पोसरी तलाव आणि मालवणी गावातील लोटस तलावाची स्वच्छता, सुशोभीकरणाचा प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय यापूर्वीच प्रशासनाने घेतला होता. यापैकी दोन तलावांची कामे सुरू झाली असून उर्वरित तलावाचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, असे महानगरपालिकेच्या पी-उत्तर विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. मालवणी आणि आसपास समुद्रकिनारा असून या परिसरातील गोड्या पाण्याच्या स्रोतांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यामुळे या १८ तलावांची स्वच्छता, संवर्धन, सुशोभिकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून लवकरच या कामांना सुरुवात करण्यात येईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 10:25 IST

संबंधित बातम्या