मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची कोणाची हिंमत नाही. तसा कोणी विचारही करू शकत नाही. आम्हाला मुंबई महाराष्ट्रापासून नव्हे, तर शिवसेनेच्या भ्रष्टाचारापासून वेगळी करून महाराष्ट्राला भूषण वाटेल अशी मुंबई तयार करायची आहे. त्यासाठी आगामी महापालिका निवडणुकीत लंका दहन होणार, मुंबई महापालिकेवर भाजपाचा भगवा फडकणार, असा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केला. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारचा ढाचा पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

शिवसेनेने सुरू केलेल्या शिवसंपर्क अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री ठाकरे यांची सभा शनिवारी वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर झाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांच्या वजनाने बाबरी मशिद खाली आली असती, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. यावर भाजपातर्फे हिंदी भाषी महासंकल्प सभा गोरेगावातील नेस्को मैदानावर रविवारी पाड पडली. यावेळी फडणवीस यांनी आपल्या भाषणात ठाकरे यांनी भाजपावर केलेल्या आरोपांना उत्तर दिले. अयोध्येला गेलो तेव्हा मी नगरसेवक आणि वकील होतो, असे सांगत गोळ्या -लाठ्यांची पर्वा न करता अयोध्या आंदोलनात गेलो होतो. बाबरी पाडायला गेलो होतो. तुम्हाला मिर्ची का लागली, असा सवाल फडणवीस यांनी एका गाण्याचे बोल वापरत केला.

यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही याबाबत भाष्य केले आहे. अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करत मुख्यमंत्र्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. वज़नदार ने हल्के को, बस हल्के से ही वज़न से, कल ‘हल्का’ कर दिया, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शनिवारी सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. “बाबरी पडली तेव्हा अयोध्येत शिवसैनिक नव्हते, मी तेथे गेलो होतो, असे फडणवीस म्हणतात. अरे त्यावेळी तुमचं वय काय होतं? तेव्हा अयोध्येला शाळेची किंवा कॉलेजची सहल गेली होती का? तुमचं वय काय होतं, तुम्ही बोलताय काय? तुम्ही आमच्यावर शंका घेता. मग मी देखील देवेंद्र फडणवीसांना एक सवाल विचारतो, तुम्ही देशासाठी सोडा हिंदुत्वासाठी काय केलं, हे सांगा. भाजपाने बाबरी पाडलीच नाही. पण देवेंद्र फडणवीस, तुम्ही त्याठिकाणी असतात आणि बाबरी मशिदीवर नुसता चढायचा प्रयत्न केला असतात तर तुमच्या वजनानेच बाबरी मशीद खाली आली असती. कारसेवकांना श्रमच करावे लागले नसते. तुम्ही एक पाय जरी टाकला असता तर बाबरी मशीद खाली आली असती. आता भाजपावाले म्हणतात की, जो पडला होता, तो केवळ बाबरीचा ढाचा होता. मग त्यावेळी भाजपाने आम्ही मशीद पाडून मंदिर बांधले, असा गवगवा का गेला,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.