भविष्यातील आव्हाने आणि उपाययोजनांचा  समावेश

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : पालिका आणि एम्पॉवर फाऊंडेशन ही स्वयंसेवी संस्था यांनी आरे वसाहतीत राबवलेल्या स्वच्छता अभियानात ५६ ठिकाणी साचलेला कचरा स्वच्छ करण्यात आला. या अभियानाचा अहवाल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि आमदार रवींद्र वायकर यांना सादर करण्यात आला आहे. यात भविष्यातील आव्हानांसह उपाययोजनाही सुचवण्यात आल्या आहेत.

आरे वसाहतीच्या ‘पी दक्षिण’ विभागात येणाऱ्या भागातील कचरा उचलण्यात आला; मात्र ‘के पूर्व’ विभाग आणि ‘एस विभाग’ येथील काही भागातील कचरा अद्याप तसाच आहे. तोही स्वच्छ करण्याची गरज अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. आरेतील ८०० एकर जागा वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आली आहे. त्यामुळे येथील स्वच्छतेची जबाबदारी निश्चित करण्याबाबत अहवालात सुचवण्यात आले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, पालिका आणि आरे प्रशासन यांच्यापैकी कोणता विभाग ८०० एकरातील स्वच्छतेची जबाबदारी घेईल हे ठरवण्याची गरज आहे. शिवाय एकदाच राबवलेले स्वच्छता अभियान पुरेसे नसून त्यात सातत्य आवश्यक असल्याकडेही अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.

आदिवासी पाडे, म्हशींचे गोठे आणि झोपडपट्टय़ांमधून येणारा कचरा ही आरेतील कायमस्वरुपी समस्या आहे. त्यामुळे तेथे कचरा उचलण्याची नियमित व्यवस्था करणे, कचराकुंडय़ा ठेवणे, जनजागृती करणे असे उपाय सुचवण्यात आले आहेत. आरेमध्ये येणारे पर्यटकही मोठय़ा प्रमाणावर कचरा करतात. त्यांच्यासाठी कचराकुंडय़ा ठेवणे व सूचना फलक लावणे तसेच कचरा करणाऱ्यास दंड ठोठावणे आवश्यक असल्याचे मत अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. अनेकदा बांधकामातून निर्माण झालेला कचरा आणून आरेमध्ये टाकला जातो. याला आळा घालण्यासाठी गोरेगाव, मरोळ व पवई येथील प्रवेशद्वारांवर वाहनांची तपासणी करणे, रात्री गस्त घालणे, नियम मोडणाऱ्यांना दंड ठोठावणे अशा उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Report of sanitation campaign in are presented to environment minister akp
First published on: 13-02-2022 at 01:07 IST