केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार संशयित व लक्षणे असलेल्या व्यक्तींचे नमुने घेतल्यानंतर २४ तासांच्या आत वैद्यकीय तपासणी करून अहवाल संकेतस्थळावर टाकावेत आणि त्याची प्रत महापालिकेकडेही पाठवावी, असे निर्देश पालिका आयुक्त आय. एस. चहल यांनी खासगी प्रयोगशाळांना दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खासगी प्रयोगशाळांबद्दल येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी प्रयोगशाळांच्या प्रतिनिधींबरोबर एक विशेष बैठक दृकश्राव्य माध्यमातून घेतली. त्यात आयुक्तांनी या प्रयोगशाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसवणारे आदेश दिले. परदेशातून आलेल्या तसेच घरीच विलगीकरणात असलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी विलगीकरणाच्या १४ दिवसांच्या आत करावी, असेही निर्देश त्यांनी दिले. यासाठी देखील खासगी प्रयोगशाळांनी आवश्यक ते नियोजन व व्यवस्थापन करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

खासगी प्रयोगशाळांनी संशयितांचे नमुने घेतल्यानंतर तीन ते चार दिवस रुग्णाला अहवालाची प्रतीक्षा करावी लागते. ती व्यक्ती बाधित असेल तर संसर्गाचा धोकाही असतो. तसेच अनेकदा खासगी प्रयोगशाळा सवडीने एकत्रितपणे अहवाल संकेतस्थळावर टाकतात व पालिकेला कळवतही नाहीत. त्यामुळे पालिकेच्या आकडेवारीतही तफावत येते.

अनेकदा रुग्णांचे संपर्क क्रमांक, पत्ता नीट नोंदवून घेतलेला नसतो. तसेच डॉक्टरांनी तपासणी करण्याची चिठ्ठी अहवालासोबत नसते. अशा अनेक तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी शुक्रवारी खासगी प्रयोगशाळांना फैलावर घेतले.

या बैठकीत आयुक्तांनी प्रयोगशाळांनी वैद्यकीय चाचणी अहवाल काटेकोरपणे, बिनचूकपणे व वेळेच्या वेळेत संबंधित संकेतस्थळावर टाकण्याचे निर्देश दिले. कोणत्याही परिस्थितीत अहवाल अपलोड करण्यास विलंब होणार नाही, याकडे अत्यंत काटेकोरपणे प्रयोगशाळांनी लक्ष द्यावे, असेही आयुक्तांनी निर्देश  दिले. सहाय्यक आयुक्तांनी देखील त्यांच्या कार्यक्षेत्रातील खासगी प्रयोग शाळांच्या कामकाजावर लक्ष ठेवावे, अशाही सूचना महापालिकेच्या सर्व सहाय्यक आयुक्तांना महापालिका आयुक्तांनी बैठकीदरम्यान दिल्या.

मुंबई बाहेरच्या रुग्णांचीही नोंद ठेवा

मुंबई महापालिका क्षेत्रातील रुग्ण असल्यास त्याची माहिती देताना ‘मुंबई‘चा पर्याय निवडावा. इतर महापालिका क्षेत्रातील व्यक्तींची माहिती देताना रुग्ण ज्या महापालिका क्षेत्राचा रहिवासी असेल त्यानुसार संबंधित महापालिकेच्या नावाचा पर्याय संकेतस्थळावर निवडावा, अशीही सूचना महापालिका आयुक्तांनी खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांना केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Report within 24 hours after medical examination abn
First published on: 23-05-2020 at 00:39 IST