महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीत संपूर्ण ताकदीनिशी लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळावा पार पडला यावेळी काही पक्षप्रवेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमामध्ये राज यांना प्रश्न विचारताना एका पत्रकाराने चुकून ‘ब्लू प्रिंट’ऐवजी ‘ब्लू फिल्म’बद्दल राज ठाकरेंकडे चौकशी केली. या प्रश्नाला राज यांनी देलेल्या उत्तरानंतर सभागृहामध्ये एकच हशा पिकला.

राज ठाकरे यांच्या उपस्थित आज एमआयजीमध्ये पार पडलेल्या मेळाव्यामध्ये काही नेत्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. यामध्ये धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांच्याबरोबरच नाशिकचे शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर मनसेमध्ये प्रवेश केला. पक्षामध्ये प्रवेश केलेले नेते निवडणूक लढवणार असल्याचे राज यांनी यावेळी जाहीर केले. त्यानंतर राज यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले. ‘मनसेमध्ये इनकमिंग सुरु झाले आहे का?’ असा सवाल राज यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी ‘आता मी रोज चार चार पाच पाच नावं सांगत जाईल’ असं उत्तर दिले. त्यानंतर राज हे माईक खाली ठेवत असतानाच एका पत्रकाराने त्यांना ‘ब्लू फिल्मसंदर्भात…’ अशी प्रश्नाला सुरुवात केली. या पत्रकाराला राज ठाकरे यांनी लगेचच ‘मी ब्लू फिल्म नाही करत आहे,’ असे उत्तर दिले. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला आणि राज यांनाही हसू थांबवता आले नाही. ‘नाही मला ब्लू प्रिंट म्हणायचं होतं,’ असं नंतर तो पत्रकार म्हणाला. यावर राज यांनी ‘असं सगळ्या कॅमेरांसमोर विचारणं बरं दिसत नाही,’ असा टोलाही लगावला. राज यांनी २०१४ च्या निवडणुकीमध्ये सादर केलेल्या ब्लू प्रिंटप्रमाणे काही ब्लू प्रिंट यंदा मांडणार आहात का असा सवाल या पत्रकाराला विचारायचा होता.

दरम्यान, राज ठाकरे यांनी या मेळाव्यामध्ये पाच ऑक्टोबर रोजी आपली पहिली प्रचार सभा असेल अशी माहिती दिली. तसेच इतक्या दिवस जे जे बोललो नाही ते लवकरच बोलेल असं ही यावेळी राज यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.