धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना सरकारी यंत्रणांकडून सुस्थितीतील पर्यायी घरे उपलब्ध करण्यात आलेले अपयश, विकासकांकडून होणारी फसवणूक, तसेच वर्षांनुवर्षे संक्रमण शिबीर नामक नरकात दिवस कंठणाऱ्यांचे हाल पाहून मोडकळीस आलेल्या इमारतींमधील घर सोडण्यास रहिवाशी राजी नाहीत. आगीतून फुफाटय़ात जाण्यापेक्षा हे रहिवाशी गळक्या धोकादायक छप्पराखाली जीवन जगणे नाईलाजाने स्वीकारत आहेत.
मुंबईमधील मोडकळीस आलेल्या चाळींची दुरुस्ती करणे दुरुस्ती मंडळाला अशक्य झाल्यामुळे तेथील रहिवाशांना संक्रमण शिबिराच्या आश्रयाला जाणे भाग पडले. काही इमारतींची प्रकरणे न्यायप्रविष्ट झाल्यामुळे रहिवाशांना गेली अनेक वर्षे संक्रमण शिबिरातच खितपत पडावे लागले आहे. गेल्या दशकामध्ये मुंबईत पुनर्विकासाचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. चाळीतील १०० चौरस फुटाच्या घराऐवजी टोलेजंग टॉवरमध्ये झकपक घरे देण्याचे स्वप्न विकासकांनी चाळकऱ्यांना दाखविले आणि ‘माया’जालात अडकून अनेकांनी आपली घरे विकासकांच्या ताब्यात दिली. मात्र पुनर्विकासाला खो बसल्याने मुळ घर नाही आणि घरभाडेही नाही अशा कात्रित सापडलेल्या रहिवाशांचे संसार उघडय़ावर पडले.
संक्रमण शिबिरात खितपत पडलेल्या आणि विकासकाकडून फसवणूक झालेल्यांची अवस्था पाहून धोकादायक इमारतींमधील रहिवाशी घर सोडायला तयार नाहीत. महापालिकेने अलिकडेच आपल्या अतिधोकादायक इमारती रिकाम्या केल्या. परंतु पालिकेने दिलेले पर्यायी घर राहण्यायोग्य नसल्यामुळे अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशी तेथे जाण्यास तयार नव्हते. अनेक रहिवाशी मुळ घराच्या परिसरात रुळले होते. त्यांना दुसऱ्या ठिकाणी जाण्यात रस नव्हता. अखेर प्रशासनाने निलंबनाची धमकी दिल्यामुळे त्यांना घर सोडावे लागले होते. मात्र धोकादायक अवस्थेतील खासगी इमारतींमधील घरे रिकामी करण्याचे आव्हान शासकीय यंत्रणांपुढे आहे. या इमारतींमधील रहिवाशांना राहण्यायोग्य पर्यायी घर उपलब्ध करण्यात येत नाही, नियोजित वेळेत नवी इमारत उभी करण्याचे ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत हे रहिवाशी घर रिकामे करणार नाहीत.