‘गेट वे’ येथून बोटीने जाणाऱ्या पर्यटकांमध्ये मोठी घट; करोना चाचणी बंधनकारक केल्याचा परिणाम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लागू केलेल्या कडक नियमांचा फटका जल पर्यटन व्यवसायाला बसला आहे. पालिकेने गेटवे ऑफ इंडियाच्या प्रवेशद्वारावर करोना चाचणी बंधनकारक केल्याने पर्यटकांच्या रांगा लागत आहेत. करोना चाचणी करावी लागेल म्हणून अनेक पर्यटक माघारी फिरत आहेत. परिणामी, गेल्या काही दिवसांत मांडवा, अलिबाग, घारापुरी लेणी येथे बोटीने जाणाऱ्या पर्यटकांची संख्या सुमारे ८० ते ९० टक्क्यांनी कमी झाली आहे.

‘होळी आणि सलग सुट्ट्यांच्या काळात दरवर्षी ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथून मांडवा, अलिबाग, घारापुरी लेणी, जेएनपीटी बंदर आणि बोटीतून समुद्रात फे रफटका मारण्यासाठी एका दिवसात ३० ते ४० हजार प्रवासी जातात. सुट्टीच्या दिवशी दिवसभर प्रवाशांची रांग लागलेली असते. सद्य:स्थितीत पर्यटकांची संख्या आटली असून दिवसभरात ७०० ते १००० पर्यटकच येत आहेत. त्यातच प्रवेशद्वारावरील पालिकेच्या करोना चाचणी केंद्रामुळे काही पर्यटक त्यांचा बेत बदलत आहेत. त्यातून व्यवसायला मोठा फटका बसला आहे. सध्या मांडवा येथे दरदिवशी २५ फेऱ्या होत आहेत. मात्र बोटीसाठी लागणाऱ्या डिझेलचा खर्चही त्यातून भागत नाही, अशी व्यथा महेश ट्रव्हल्स अ‍ॅण्ड टुर्सचे व्यवस्थापक पंचराज सिंग यांनी मांडली.  होळीच्या दिवशी घारापुरी येथे पर्यटकांना पोहोचविण्यासाठी ७० बोटी कमी पडत असत. आज फक्त ५ बोटीतूनच पर्यटक गेले. एका बोटीची शंभर प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. पण केवळ ४० ते ५० प्रवासी न्यावे लागत आहेत. परिणामी येथील जल वाहतुकीवर उदरनिर्वाह असलेल्या १००० व्यक्तींवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळेल, अशी भीती अजिंठा बोटीचे मालक फुरखान युसूफ चाउस यांनी व्यक्त केली.

एका तिकीटाची विक्री केल्यानंतर चार रुपये पदरात पडतात. गुरुवारी दिवसभरात के वळ २५ तिकिटे विकली गेली. त्यामुळे के वळ १०० रुपये मिळाल्याचे येथील कर्मचारी सचिन शर्मा यांनी व्यक्त के ली.

प्रवाशांचे करोना अहवाल बाधित

गेटवे ऑफ इंडिया येथे जाण्यापूर्वीच पर्यटकांकडील तिकिटाची पाहणी करून प्रवेशद्वारावरच त्यांची करोना चाचणी केली जात होती. मात्र यामुळे व्यवसायावर परिणाम होऊ लागल्याने बोट व्यावसायिकांनी त्याला विरोध केला. त्यातून शुक्रवारपासून पर्यटन करून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी सुरू केली आहे. गेटवे ऑफ इंडिया येथून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला चाचणी करणे बंधनकारक केले होते. शुक्रवारी दुपारी चार वाजेपर्यंत सुमारे ६०० हून अधिक प्रवाशांची करोना चाचणी केली होती. त्यातील सुमारे २५ पर्यटकांचे करोना अहवाल बाधित आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Restrictions hit boat tourism akp
First published on: 03-04-2021 at 00:01 IST