भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील एकमेव गेंडा- शिवा मुंबईकरांचा निरोप घेणार आहे. या गेंडय़ासाठी जोडीदार शोधण्यात उद्यान प्रशासनाला अपयश आल्याने बुधवारी या गेंडय़ाची रवानगी नवी दिल्ली येथील केंद्रीय प्राणीसंग्रहालयात केली जाणार आहे. मादी जोडीदार मिळवण्यासाठी केल्या गेलेल्या जनहितयाचिकेमुळे गेली अनेक वर्षे शिवा चर्चेत राहिला होता.
आसामच्या राज्य प्राणीसंग्रहालयाकडून मार्च १९८५ मध्ये सहा वर्षांंचा शिवा मुंबईच्या उद्यानात आणला गेला. त्यानंतर तब्बल २८ वर्षे तो या उद्यानात होता. एकाकी, जोडीदार नसलेल्या प्राण्यांना उद्यानात आणल्यापासून सहा महिन्यांच्या आत जोडीदार प्राणी प्राप्त करून देण्याचे कायदेशीर बंधन आहे. मात्र एकाकी शिवाला जोडीदार मिळत नव्हता. याबाबत जनहितयाचिका दाखल झाल्यावर मुंबई उच्च न्यायालयाने २००५ मध्ये महानगरपालिका प्रशासनाला गेंडय़ासाठी जोडीदार निवडण्याचे आदेश दिले आणि शिवा चर्चेत आला. त्यानंतर पालिकेने आसाम, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, बिहार तसेच बर्लिन, जर्मनी येथील प्राणीसंग्रहालयांसोबत पत्र व्यवहार करून शिवासाठी जोडीदार आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपयशी ठरला. त्यातच गेल्या वर्षी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयानुसार भारतीय एकशिंगी गेंडा प्रदर्शित करण्यावर बंदी घातली. या सर्व परिस्थितीमुळे अखेर शिवाला दिल्ली येथील प्राणीसंग्रहालयात नेले जाणार आहे. उद्यानातील गेंडय़ाच्या निवासस्थानी बारशिंगा जातीच्या हरणांसाठी निवासस्थान विकसित केले जाणार आहे.