मुंबई: जागतिक तसेच देशांतर्गत आघाडीवर सोन्याच्या दराने सरलेल्या वर्षात सोन्याच्या किमतीत ३३ टक्क्यांहून अधिक वाढीसह तोळ्यामागे एक लाख रुपयांची शिखर पातळी गाठली. शिवाय पुढेही दरवाढीचे अनुमान पाहता, देशांतर्गत सोन्याच्या दागिन्यांच्या वापरात ९-१० टक्क्यांनी घट होण्याची शक्यता गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या ‘इक्रा’च्या अहवालाने व्यक्त केली.

आर्थिक वर्ष २०२३-२४ आणि २०२४-२५ मध्ये सोन्याचे बार आणि नाण्यांच्या मागणीत अनुक्रमे १७ टक्के आणि २५ टक्क्यांनी वाढ झाली. जागतिक स्तरावरील आर्थिक अनिश्चितता आणि वाढलेल्या भू-राजकीय आणि व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून सोन्याला पसंती दिली, असे ‘इक्रा’ने म्हटले आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये हा कल कायम राहण्याची शक्यता आहे. बार आणि नाण्यांची मागणी सुमारे १० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे, जी देशातील एकूण सोन्याच्या मागणीच्या ३५ टक्के आहे, असे त्यात म्हटले आहे.

तथापि आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ७ टक्क्यांनी घट झाल्यानंतर, विद्यमान २०२५-२६ मध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीचे प्रमाण ९-१० टक्क्यांनी कमी होईल. सोने दागिने खरेदीत घट अपेक्षित असली तरी देशांतर्गत सोन्याच्या दागिन्यांच्या मूल्यानुसार ही वाढ वार्षिक तुलनेत दोन-अंकी पातळीवर, म्हणजेच १२-१४ टक्के राहणे शक्य आहे, असे अहवाल सांगतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संघटित आणि मोठा विस्तार असलेल्या किरकोळ सराफांच्या महसुलात विद्यमान आर्थिक वर्षात १४-१६ टक्के वाढ होणे अपेक्षित आहे. सोन्याच्या किमतीत सतत वाढीमुळे महसूल वाढ शक्य आहे. सोन्याचे सांस्कृतिक महत्त्व, लग्न-कार्यासाठी सोन्याची मागणी आणि चांगल्या मान्सूनच्या अपेक्षेने सोने खरेदी वाढण्याची शक्यता आहे. किमती सध्याच्या पातळीवर स्थिर राहिल्यास हे शक्य आहे, असे ‘इक्रा’चे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि गट प्रमुख जितिन मक्कर म्हणाले.