मावळ प्रबोधिनीच्या नदीपात्रातील कामांचा फायदा

लोणावळा : मावळ प्रबोधिनी संस्थेकडून यंदा जानेवारी ते मार्च या महिन्यात इंद्रायणी नदीचे उगमस्थान असलेल्या टाटा धरणाच्या भिंतीपासून लोणावळा बाजार परिसरापर्यंत नदीपात्र स्वच्छता, खोलीकरण तसेच रुंदीकरण मोहीम राबविल्याने यंदाच्या पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडूनही पुराचा धोका टळला. नदीपात्राचे रुंदीकरण तसेच खोलीकरण केल्याने लोणावळ्यातील नदीकाठच्या वसाहतीत पाणी शिरले नाही.

मावळ प्रबोधिनीचे संस्थापक रवींद्र भेगडे यांच्या संकल्पनेतून यंदा जानेवारी ते मार्चमध्ये नदीपात्रात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नदीपात्रात फेकून देण्यात आलेला कचरा काढण्यात आला. नदीपात्रातील गाळ काढून खोली वाढविण्यात आली तसेच पात्राचे रुंदीकरणाचे काम करण्यात आले. इंद्रायणी नदीचा उगम लोणावळ्यातील टाटा धरण परिसरातून होतो. मावळ प्रबोधिनीने टाटा धरणाची भिंत ते बाजार भागापर्यंत मोहीम राबविण्यात आली होती.

गेल्या पंधरा दिवसांपासून लोणावळ्यात मुसळधार पाऊस होत असून इंद्रायणी नदीला पूर आला. लोणावळा शहरातील नदीपात्रालगत असलेल्या भागात यंदा पाणी शिरले नाही. मावळ प्रबोधिनीकडून राबविण्यात आलेल्या उपक्रमामुळे पुराचा धोका टळला.

नदीपात्रातील कामे प्रशासनाकडून इंद्रायणी नदीच्या पुढील भागात करण्यात आल्यास पुराचे पाणी शिरण्याच्या घटना कमी होतील. लोणावळा नगरपरिषदेकडून मंगळवारी नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे काम सुरू होते. शहरातील गटार तसेच नाले तुंबल्यात तेथील कामे करण्यात येत आहे. नगरपरिषदेकडून या कामांसाठी विशेष पथक तैनात करण्यात आले. नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, लोणावळा  शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी पाहणी केली. नागरिकांना त्वरित मदत करण्यासाठी कक्ष उघडण्यात आला आहे.